
पालघरमध्ये विमानतळ उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आखली आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालघर विमानतळ उभारण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे.
महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाकडून राज्यातील विमानतळांसाठी पाठपुरावा सुरू आहे. उडाण योजनेअंतर्गत नऊ विमानतळांपैकी सहा विमानतळांवरून विमानसेवा सुरू झाली आहे. जमिनी संपादित केलेल्या ठिकाणी नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणासह विविध केंद्रीय विभागांच्या परवानग्या मिळवण्याचे काम राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य विमानतळ कंपनीकडून सोलापूर, अमरावती, कराड, धुळे व चंद्रपूरमध्ये विमानसेवा सुरू करण्याची योजना आहे. सोलापूर, अमरावती, कराड व चंद्रपूरमध्ये जागा उपलब्ध आहे. या प्रकल्पासाठी सध्या केंद्र सरकारच्या परवानग्या, पर्यावरण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र यासह इतर आवश्यक परवानग्या घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरचे विमानतळ अतिशय मोक्याचे आहे. तिरुपती दर्शन करून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूरचे स्थान विशेष आहे. कोल्हापूरहून तिरुपतीला विशेष ट्रेनही सोडण्यात येतात. तिरुपती-कोल्हापूर विमानसेवाही सध्या सुरू आहे; मात्र या विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. नाईट लँडिंगसाठी धावपट्टी वाढविण्याची गरज असून, त्यासाठी भूसंपादन करणे गरजेचे आहे. या भूसंपदानासाठी राज्य सरकारने ५२ कोटी ७२ लाख ५७ हजार ५०० रुपयांना निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.