डबेवाला कामगार पुतळा हटवण्याच्या हालचाली : १ मे रोजी पुतळा झाकून ठेवल्याने अभिवादन करता आले नाही; डबेवाल्यांनी व्यक्त केली खंत

हाजीअली येथे डबेवाला कामगाराचा पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याची भीती डबेवाला संघटनेने व्यक्त केली आहे.
डबेवाला कामगार पुतळा हटवण्याच्या हालचाली : १ मे रोजी पुतळा झाकून ठेवल्याने अभिवादन करता आले नाही; डबेवाल्यांनी व्यक्त केली खंत
Published on

मुंबई : हाजीअली येथे डबेवाला कामगाराचा पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याची भीती डबेवाला संघटनेने व्यक्त केली आहे. बुधवार १ मे रोजी कामगार दिनी पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी डबेवाले गेले असता, पुतळा झाकून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डबेवाल्यांना अभिवादन करणे शक्य झाले नाही, अशी खंत डबेवाल्यांनी व्यक्त केली. दरम्यान, याप्रकरणी उपनगराचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा पुतळा हटवू नये, अशी मागणी करणारे पत्र पालिकेच्या डी वॉर्डाचे सहाय्यक आयुक्तांना दिले आहे.

हाजीअली येथील वाहतूक बेटात तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते 'मुंबईचा डबेवाला कामगार' पुतळा बसवण्यात आला आहे. सध्या हा पुतळा येथून हटविण्याचे कारस्थान चालू झाले आहे. हे वाहतूक बेट दुसऱ्या कंपनीने देखभाल करण्यासाठी घेतले आहे. त्या कंपनीला हा पुतळा तेथे नको आहे. कंपनीला त्यांची जाहिरात तेथे करायची असल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा पुतळा येथून काढण्याचा प्रयत्न असल्याचा दावा मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केला आहे.

पुतळा म्हणजे मराठी डबेवाला कामगारांची अस्मिता

बुधवारी कामगार दिन असताना देखील हा पुतळा चारही बाजूने पत्रा मारून झाकून ठेवण्यात आला होता. हा पुतळा म्हणजे मराठी डबेवाला कामगारांची अस्मिता आहे. वेळप्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसू, पण पुतळा हटवू देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी हा पुतळा या जागेवरून हटवू देऊ नये. वाहतूक बेट एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे देखभाल करण्यास दिल्यानंतर पुतळे काढण्याचा पालिकेचा कायदा न समजण्यासारखा आहे, असे तळेकर यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in