
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाच्या (Eknath Shinde) नावावर केले. यानंतर आता ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा पक्षबांधणी करण्यास सुरुवात केली असून आज ठाकरे गटाचे मुख्य नेते उद्धव ठाकरे हे रत्नागिरीतील खेडमध्ये मोठी सभा घेणार आहेत. याबाबत बोलताना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, "नाव आणि चिन्ह मिळवलं पण जनतेचे प्रेम मिळणार नाही." असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. तसेच, उद्धव ठाकरेंच्या सभांना अफाट गर्दी होणार, असा विश्वासदेखील यावेळी त्यांनी दर्शवला.
प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ कागदावरची शिवसेना आहे. ज्यांना निघून जायचं होते, ते निघून गेले. आता सगळे फक्त निष्ठावंत उरले. यानंतरही आजही शिवसेना त्याच ताकदीने उभी असून निघून गेलेल्या लोकांमुळे शिवसेनेवर अजिबात परिणाम झाला नाही. शिंदे गटाला कागदावरच नाव आणि चिन्ह मिळाले. पण शिवसैनिक आणि जनता नाही मिळाली. शिवसैनिक आणि जनता कोणाला द्यायची, त्याचा निवडणूक आयोगाला अधिकारही नाही. हा फक्त कागदावरचा निर्णय आहे, कागदावरच राहणार आहे." असे म्हणत त्यांनी टीका केली.
आज रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची सभा होणार असून ही सभा अतिविराट होणार आहे. कोकण कायमच शिवसेनेचा गड राहिला असून सुरुवातीपासून शिवसेनेच्या वाढीमध्ये, संघर्षामध्ये कोकणाचे मोठे योगदान आहे. कोकणाने नेहमी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर श्रद्धा ठेवली. म्हणूनच आज खेडमध्ये जाऊन उद्धव ठाकरे सभा घेणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये अनेक सभा होणार आहेत. यानंतरची सभा मालेगावात होणार असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे." अशी माहितीदेखील त्यांनी दिली.