तंत्रनिकेतन शिक्षण संस्थांमध्ये 'के स्कीम' अभ्यासक्रम रचना; 'आय' स्कीमच्या पहिल्या, दुसऱ्या सत्रातील विषय होणार बंद
मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) राज्यातील तंत्रनिकेतन शिक्षण संस्थांमध्ये ‘के स्कीम’ ही अभ्यासक्रम रचना लागू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने पदविका ‘आय’ स्कीम अभ्यासक्रमाच्या पहिला व दुसऱ्या सत्रातील विषय उन्हाळी सत्र परीक्षेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम ‘के स्कीम’ अंतर्गत सुधारित करण्यात आला. या अभ्यासक्रम बदलाच्या प्रक्रियेचा पुढील टप्पा म्हणून आता ‘आय’ स्कीमचे पहिला व दुसरा सेमिस्टर पूर्णतः बंद करण्यात येत आहेत. मात्र, हा बदल नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि ‘आय’ स्कीममध्ये विविध कारणाने अनुत्तीर्ण, केटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे. या निर्णयामुळे इंग्रजी, बेसिक सायन्स, बेसिक मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, अप्लाइड मॅथेमॅटिक्स, इंजिनियरिंग ड्रॉईंग, सी प्रोग्रामिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्सटाईल, फूड टेक्नॉलॉजी, प्रिंटिंग, मायनिंग, केमिकल, फॅशन अँड अपॅरल आदी अनेक विषयांचे ‘के’ स्कीममधील नव्या विषयांशी समतुल्यीकरण करण्यात आले आहे. याबाबत मंडळाने संकेतस्थळावर पहिले सत्र आणि दुसरे सत्र याची स्वतंत्र विषयनिहायी यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये जुना विषय, त्याच्या जागी लागू होणारा नवा विषय आणि संबंधित कोर्स कोड स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना जुन्या विषयाऐवजी नव्या विषयाचीच नोंद करावी लागणार आहे. काही मोजके विषय मात्र नेहमीप्रमाणे ‘आय’ स्कीममध्येच सुरू राहणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
‘आय’ स्कीम म्हणजे काय?
मंडळाने पदविका अभ्यासक्रमांसाठी २०१६ नंतर टप्प्याटप्प्याने लागू केलेल्या अभ्यासक्रमास ‘आय’ म्हंटले जाते. या स्कीममध्ये अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण, विषयांचे पुनर्रचना आणि सेमिस्टर पद्धतीत सुधारणा करण्यात आली होती. अनेक वर्षे पदविका शिक्षणाचा कणा ठरलेली ही स्कीम पहिला व दुसरा सत्रा पर्यंत लागू होती. मात्र, पुढील अभ्यासक्रम बदलांच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी २०२६ परीक्षेपासून ‘आय’ स्कीमचे पहिला व दुसरा सेमिस्टरचे विषय बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या स्कीममध्ये अनुतीर्ण झालेले विद्यार्थी आता जुन्या विषयांमध्ये परीक्षा देऊ शकणार नाहीत.
के स्किम म्हणजे काय?
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ‘के’ स्कीमची अंमलबजावणी सुरू झाली. यामध्ये कौशल्याधारित शिक्षण, उद्योगाभिमुख विषय, अद्ययावत अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीत बदल यावर भर देण्यात आला आहे. उन्हाळी २०२६ सत्रा पासून डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या पहिला व दुसरा सेमिस्टरसाठी ‘के’ स्कीम पूर्णतः लागू राहणार असून, ‘आय’ स्कीममधील नापास विद्यार्थ्यांनाही ‘के’ स्कीममधील समतुल्य विषयांमध्येच परीक्षा द्यावी लागणार आहे.

