कनेक्टिंग लिंकवर 'नो सेल्फी'; MSRDCचे वाहनधारकांना आवाहन; थांबल्यास दंडाचा इशारा

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज आणि बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
कनेक्टिंग लिंकवर 'नो सेल्फी'; MSRDCचे वाहनधारकांना आवाहन; थांबल्यास दंडाचा इशारा
Published on

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक ( मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज आणि बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केले आहे. असे करणाऱ्यांना दंडाचा इशाराही देण्यात आला आहे.

कनेक्टिंग लिंक प्रकल्पावर बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा आणि बस तसेच प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला आहे. परंतु, वाहनधारक या मार्गावर सेल्फी, फोटो आणि रिल काढण्यासाठी थांबू लागल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने वाहनधारकांना सेल्फी, फोटो अथवा रिल काढण्यासाठी थांबणाऱ्या वाहनावर मोठ्या दंडाची आकारणी करण्याचा इशारा दिला आहे. सेल्फीसाठी थांबल्यास तुमच्यासह इतरांच्या वाहनांनाही धोका निर्माण होऊ शकतो असे बजावण्यात आले आहे.

कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे आणि दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असून द्रुतगती मार्गावर थांबणाऱ्या गाड्यांची माहिती महामार्ग पोलिसांना दिली जाणार असल्याचे एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in