मुंबई : एसटीला १२ मीटर बस चालविताना प्रति किलोमीटर १२ रूपये आणि ९ मीटर बस चालविताना १६ रुपये प्रति किलोमीटर तोटा ग्राह्य धरून काही वर्षांत ३ हजार १९१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. तोट्याची रक्कम शासनाकडून देण्याचे मान्य केल्यास ई-बस पुरवठ्याचा करार पूर्णत्वास जाऊ शकतो. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
इवे ट्रान्स कंपनीकडून ५ हजार १५० इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला. प्रवाशांना या बसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महामंडळाला ई- बसचा पुरवठा करावा, असे निर्देश सरनाईक यांनी शुक्रवारी दिले.
बस पुरवठादार कंपनीने दिलेल्या वेळापत्रकानुसार बस पुरवठा करणे अपेक्षीत असून कंपनीने दिलेल्या बसचा तोटा लक्षात घेता शासनाकडून निधी मिळण्यासाठी व्यवहार्यता अंतर अर्थपुरवठ्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे निर्देश मंत्र्यांनी दिले.