
मुंबई : उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या व्यावसायिक भागीदारीतून एसटी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेवर विविध ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ विक्री पंप सुरू करीत असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या ७० वर्षांपेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे. सध्या २५१ ठिकाणी एसटीच्या स्वतः च्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून याद्वारे केवळ एसटीच्या बसेससाठी डिझेल इंधनाचे वितरण होते. त्यामुळे भविष्यात केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम असलेल्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या ऑइल विक्री करणाऱ्या कंपन्यांशी व्यावसायिक करार करून सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल व तत्सम इंधन विक्री करणारे पंप उभा करणे प्रस्तावित आहे. त्यानुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या स्वतःच्या ज्या जागा आहेत, त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अशा २५ बाय ३० मीटर जागा निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी एसटी महामंडळातर्फे केवळ इंधन विक्रीच नाही तर रिटेल शॉप देखील उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथे इतर व्यवसायाला देखील पूरक संधी उपलब्ध होईल, यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक भागीदारीतून चांगला महसूल देखील मिळू शकतो, असे सरनाईक म्हणाले.
'पेट्रो - मोटेल हब' उभारणार!
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांशी राज्य शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या एसटी महामंडळाचा व्यावसायिक भागीदारीचा करार करण्यात येईल. यासाठी संबंधित कंपन्यांनी राज्यभरात एसटी महामंडळाच्या सर्व जागांचे व्यावसायिक सर्वेक्षण करून २५१ ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपाचे एसटी महामंडळाच्या स्वतःच्या नव्या व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या २५ बाय ३० मीटर जागेवर स्थलांतर केले जाईल, जिथे एसटी महामंडळाला स्वतःच्या बसेससाठी इंधन भरण्याची सोय असेल. याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकाला देखील किरकोळ इंधन विक्री करणे शक्य होईल अशा पद्धतीचे 'पेट्रो-मोटेल हब' उभा करण्याचा मानस सरनाईक यांनी व्यक्त केला.