
मुंबई : रिलायन्स कंपनी समूहाचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी ईमेलद्वारे चारशे कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन कॉलेज तरुणांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि गावदेवी पोलिसांनी गुजरात व तेलंगणा येथून अटक केली. राजवीर जगतसिंह खंत व गणेश रमेश वनपर्थी अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही कॉलेज विद्यार्थी आहेत. केवळ मजा म्हणून त्याने खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले; मात्र ही मजा त्यांच्या चांगलीच अंगाशी आली आहे.
मुकेश अंबानी हे भारतासह विदेशात प्रसिद्ध उद्योगपती म्हणून परिचित असून ते रिलायन्स कंपनी समूहाचे अध्यक्ष आहेत. गेल्या आठवड्यात त्यांना एका शादाब खान नाव सांगणाऱ्या व्यक्तीच्या एक मेल आला होता. या मेलमध्ये त्यांच्याकडे २० कोटीची मागणी करण्यात आली होती; मात्र त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नव्हते. त्यामुळे या व्यक्तीने त्यांना पुन्हा मेल पाठवून त्यांच्याकडे दोनशे कोटीची मागणी केली होती. तुम्ही माझ्या मेलला प्रतिसाद दिला नाही म्हणून तुम्हाला आता दोनशे कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचे शूटर तयार असून, ते शूटर कुठल्याही क्षणी त्यांचा गेम करतील, अशी धमकीवजा इशारा दिला होता. या धमकीनंतर त्यांच्या वतीने त्यांच्या सुरक्षारक्षक सुपरवायझरने गावदेवी पोलिसात तक्रार केली होती.