मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर गोल्फ कोर्स; भाजप आमदार मिहिर कोटेचा यांची माहिती

पूर्व उपनगरातील मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर गोल्फ कोर्स बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले.
मिहिर कोटेचा
मिहिर कोटेचा संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर गोल्फ कोर्स बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले. याठिकाणी नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार असून याठिकाणी असलेला कचरा दुसऱ्या ठिकाणी हलवणार असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्याचे कोटेचा यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे कोटेचा यांनी सांगितले.

मुलुंड येथील कचरा भूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट योग्य

पद्धतीने करण्यात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. २०१८ साली मुलुंड कचराभूमी बंद करण्यात आली आणि बायोमायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला कचरा प्रक्रिया करण्यासाठी कंत्राट देण्यात आले. सहा वर्षांत हे काम होणे अपेक्षित होते. मात्र हे काम दिरंगाईने सुरू असल्याचे कोटेचा यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. यावर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोरोनामुळे विलंब झाला होता, मात्र आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितल्याचे मिहिर कोटेचा म्हणाले.

डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचा ढिगारा एका इंचाने कमी न झाल्याचे कोटेचा यांनी निदर्शनास आणून दिले. यावर गगराणी यांनी सांगितले की, ६५ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे मात्र त्याचे डम्पिंग अजून सुरू झालेले नाही. महापालिकेने निवड केलेल्या जागेवर प्रक्रिया केलेला कचरा एका वर्षात टाकला जाईल आणि मुलुंड येथील कचरा भूमीची जागा समतोल केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच याठिकाणी असलेला कचरा दुसऱ्या ठिकाणी हलवणार असल्याचे आश्वासन मुंबई महापालिका प्रशासनाने दिल्याचे कोटेचा यांनी यावेळी सांगितले.

२४ हेक्टर जागा खुली राहणार

प्रक्रिया केलेला कचरा टाकून झाल्यानंतर २४ हेक्टर इतकी जागा ही शहराला खुली जागा म्हणून प्राप्त होईल. त्याठिकाणी विविध सार्वजनिक सोयी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्या समतोल झालेल्या जागेवर गोल्फ कोर्स बनविण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याचे कोटेचा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in