दरवाजा ठोठावल्याचा संशय, चार वर्षांच्या मुलाला मारहाण; गुन्हा दाखल

दरवाजा ठोठावल्याच्या संशयावरून घरासमोरच खेळत असलेल्या एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलाला काठीने मारहाण
दरवाजा ठोठावल्याचा संशय, चार वर्षांच्या मुलाला मारहाण; गुन्हा दाखल
Published on

मुंबई : दरवाजा ठोठावल्याच्या संशयावरून घरासमोरच खेळत असलेल्या एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलाला काठीने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार मुलुंड परिसरात घडला. याप्रकरणी मुलाच्या आईच्या तक्रारीवरून रवी मदन शिंदे या मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नवघर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

२३ वर्षांची तक्रारदार महिला नाशिकची रहिवाशी आहे. मुलाचा वाढदिवस असल्याने ती शनिवारी २० जानेवारीला तिच्या मुलुंड येथील माहेरी आली होती. रविवारी दुपारी साडेतीन वाजता ती घरी जेवण बनवत होती. यावेळी तिच्या मामाच्या मुलीने तिच्या चार वर्षांच्या मुलाला रवी शिंदे या व्यक्तीने मारहाण केल्याचे सांगितले. त्यामुळे ती बाहेर आली असता, तिला तिचा मुलगा लपून बसल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने त्याला जवळ करून काय झाले, याबाबत विचारणा केली होती. यावेळी या मुलाने रवीच्या घराचा दरवाजा कोणीतरी ठोठावला होता, तो दरवाजा त्याने ठोठावला म्हणून त्याने त्याला काठीने बेदम मारहाण केल्याचे सांगितले. याबाबत तिने चौकशी केली असता रवी शिंदे हा त्याच परिसरात राहत असून, त्याने तिच्या मुलाला मारहाण केल्याची कबुली दिली.

logo
marathi.freepressjournal.in