

मुंबई : मुलुंड येथे मेट्रो ४ मार्गिकेचा पॅरापेट कोसळल्याच्या घटनेनंतर मेट्रो ४ मार्गिकेच्या संरचनेच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये भीती वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी एलबीएस रोडवरील मेट्रो लाईन ४ च्या पट्ट्याची संयुक्त पाहणी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण मेट्रो ४ मार्गिकेचे थर्ड पार्टी गुणवत्ता नियंत्रण व सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी केली.
या पाहणीला एमएमआरडीए आणि बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या टी-वार्डमधील अधिकारी उपस्थित होते. या संयुक्त पाहणीत मुलुंडमधील एलबीएस रोडवरील मेट्रो ४ च्या सात ते आठ ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. एमएमआरडीएचे मुख्य अभियंता मधुकर खरात यांच्या नेतृत्वाखालील पथक, टी-वार्ड अधिकारी योगिता कोळे उपस्थित होत्या.
शनिवारी झालेल्या पॅरापेट कोसळण्याच्या घटनेनंतर रहिवाशांकडून मेट्रो मार्गिकेवरील पॅरापेट भिंतींमध्ये अलाईनमेंटच्या समस्या, गॅप्स आणि लेव्हलमधील फरक दर्शविणारे फोटो पाठवले जात आहेत. सुमारे ५०० फोटो टी-वार्ड आपत्ती व्यवस्थापन पथकाला नागरिकांनी पाठवले असल्याचे कोटेचा यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी किरकोळ तांत्रिक व फिनिशिंगमधील त्रुटी, विशेषतः पॅरापेट भिंतींच्या अलाईनमेंट संदर्भात, मान्य केल्या असल्याचे आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले. मात्र, या त्रुटींमुळे संरचनेच्या सुरक्षिततेवर किंवा स्थैर्यावर कोणताही परिणाम झालेला नसून संरचना १०० टक्के सुरक्षित असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केल्याचे कोटेचा यांनी नमूद केले.