Mumbai : मुलुंड दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबाला ४० लाखांची भरपाई

मुलुंड येथे मेट्रो ४ मार्गिकेवरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. मृताच्या कुटुंबाला विविध माध्यमांतून नुकसाभरपाई देण्यात येणार आहे.
Mumbai : मुलुंड दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबाला ४० लाखांची भरपाई
Published on

मुंबई : मुलुंड येथे मेट्रो ४ मार्गिकेवरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. मृताच्या कुटुंबाला विविध माध्यमांतून नुकसाभरपाई देण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य सरकारचे अनुदान ५ लाख, एमएमआरडीएकडून १५ लाख आर्थिक सहाय्य, विमा नुकसानभरपाई अंदाजे १५ ते २० लाख रुपये अशी रक्कम मृताच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे.

मुलुंड घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने शासनाच्या लागू नियमांनुसार, मंजूर तरतुदीनुसार आणि करारातील जबाबदाऱ्यांनुसार सर्वसमावेशक आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. त्यानुसार तात्काळ उपाययोजनेच्या स्वरूपात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना ग्राह्य आर्थिक मदत आणि भरपाई देण्यात येणार आहे.

Mumbai : मुलुंड दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबाला ४० लाखांची भरपाई
Mumbai : मुलुंडच्या एलबीएस रोडवर भीषण अपघात; मेट्रो लाईनचा स्लॅब वाहनांवर कोसळला; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी, Video

बाधित कुटुंबीय आणि जखमी नागरिकांसोबत एमएमआरडीए ठामपणे उभे आहे. शासन नियम आणि करारातील तरतुदीनुसार सर्व ग्राह्य आर्थिक सहाय्य तातडीने देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना सरकारने जास्तीत जास्त भरपाई मिळावी आणि मृताच्या वारसाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी करत मुलुंड पोलीस ठाण्यासमोर यादव यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी जोरदार निदर्शने केली. दोषी अभियंते आणि कंत्राटदारांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. यातील अन्य दोन आरोपी मात्र फरार आहेत.

कार्यकारी अभियंता निलंबित

मुलुंड मेट्रो मार्गिकेचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका अभियंत्याला निलंबित केले आहे. कार्यकारी अभियंते सत्यजीत साळवे असे त्यांचे नाव असून त्यांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

जौनपूरच्या सरपंचाची मुंबईची सफर ठरली अखेरची

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील सरपंच रामधन यादव आणि माजी सरपंच महेंद्र यादव लग्नाच्या निमित्ताने मुंबई फिरायला आले होते. मुलुंड परिसरात सरपंच यादव यांच्या मित्राचे ऊसाचे दुकान आहे. याच दुकानातून कळव्यात एका नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी सरपंच आणि माजी सरपंच रिक्षावाला बबलू यादवसह निघाले होते. मात्र मुलुंड येथे त्यांचा प्रवास अखेरचा ठरला आहे. यामुळे यादव यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in