धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाला मुलुंडकरांचा विरोध कायम

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास मुलुंडकरांचा विरोध कायम
धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाला मुलुंडकरांचा विरोध कायम

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास मुलुंडकरांचा विरोध कायम आहेत. या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा निर्णय जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत ७ मार्चपासून साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा मुलुंडकरांनी दिला आहे.

पालिकेची प्रकल्पग्रस्त वसाहत आणि धारावी पुनवर्सन प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्याविरोधात मुलुंडकरांची गेल्या काही महिन्यांपासून आंदोलने सुरू आहेत. या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी शनिवारी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲॅड. राजकुमार अवस्थी, ‘हिरवा’ संस्थेचे भरत सोनी, हरि ओम नगर असोसिएशनचे अध्यक्ष साहेबराव सुरवाडे आणि गंगाधर तुळसनकर यांनी मार्गदर्शन केले. या जाहीर सभेला मुलुंडकरांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. मुलुंडमधील ‘प्रयास’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲड. सागर देवरे यांनी ही सभा आयोजित केली होती.

या सभेत मुलुंडमधील स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य सरकार यांची चुकीची धोरणे आणि निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त मुलुंडकरांच्या माथी मारले जात असल्याचा हल्लाबोल उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणात केला. लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून, हे प्रकल्प मुलुंडकरांच्या माथी मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकविण्यासाठी यंदा मोठे मतदान करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in