मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

यंदा कमी पाऊस झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठ्यावर परिणाम झाला आहे.
मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम
मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम
Published on: 

मुंबई : यंदा कमी पाऊस झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईकरांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. मुंबईत १५ मे २०२६ पासून लागू करण्यात आलेली १० टक्के पाणीकपात अद्याप सुरू असून, औद्योगिक व व्यापारी आस्थापना तसेच स्पोर्ट्स क्लबच्या पाणीपुरवठ्यातील २० टक्के कपातही कायम राहणार आहे. उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी पर्यायी जलस्रोतांचा वापर करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा सज्जड इशारा मुंबई पालिकेने दिला आहे.

‘एल-निनो’ आणि ‘हिंदी महासागर द्विध्रुव’ (इंडियन ओशन डायपोल) या हवामानविषयक घटकांच्या प्रभावामुळे २०२६ मध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्याचा परिणाम मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांना दररोज सुमारे ४ हजार ६६४ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, उपलब्ध जलस्रोतांमधून सरासरी ४ हजार १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार, भविष्यातील पेयजलाची गरज लक्षात घेऊन ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी नागरिक, गृहनिर्माण संस्था, औद्योगिक व व्यापारी आस्थापना, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रक्रियायुक्त पाणी, बोअरवेलचे पाणी

जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिकेने दिले आहेत. वाहनांची धुलाई, उद्यानांतील झाडांना पाणी घालणे, रस्ते धुणे आणि परिसराची स्वच्छता यांसारख्या कामांसाठी विहिरी, कूपनलिका व बोअरवेलमधील पाण्याचा वापर करावा. बांधकामांच्या ठिकाणीही पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधील प्रक्रियायुक्त पाणी किंवा बोअरवेलचे पाणी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा

प्रदूषण नियंत्रणासाठी रस्ते धुण्याच्या कामातही पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रियायुक्त पाणी किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर करण्याचे निर्देश आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि प्रसाधनगृहांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनीही शक्य तितक्या प्रमाणात पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा, असे प्रशासनाने म्हटले आहे.

गळती रोखण्यासाठी विशेष पथके

जलवाहिन्यांमधून होणाऱ्या पाणीगळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे नुकसान होऊ नये, यासाठी महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. पाणीगळतीची प्रकरणे प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनीही घरातील नळ किंवा जलवाहिन्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणी वाचवा, जीवन वाचवा

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात पाणी बचतीच्या सवयी अंगीकारल्यास उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत होईल. त्यामुळे ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवून महापालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in