कोस्टल रोड प्रकल्पबाधितांसाठी १३६ कोटींची तरतूद

आयुक्तांच्या मंजुरीनंतर मे अखेरपर्यंत मिळणार धनादेश
कोस्टल रोड प्रकल्पबाधितांसाठी १३६ कोटींची तरतूद

कोस्टल रोड प्रकल्पात बाधित मच्छीमारांना ऑक्टोबर २०१८ पासून ते मे २०२४ पर्यंतची नुकसान भरपाई चार टप्प्यांत देण्यात येणार आहे. यासाठी १३६ कोटींची तरतूद करण्यात आली असून, अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांना सादर केला आहे. आयुक्त व प्रशासक म्हणून मंजुरी मिळाल्यानंतर मे अखेरपर्यंत मच्छीमार, बोटींचे मालक, चालक, समुद्र किनारी मच्छीमार करणारे अशा एकूण १,३४३ नुकसान भरपाईचे धनादेश देण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सुरू आहे. मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली; मात्र कोस्टल रोड प्रकल्पात मच्छीमारांचा रोजगार जाईल, अशी सूचना मच्छीमार संघटनांनी केली. यानंतर टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानंतर टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सने दिलेल्या अहवालानुसार १,३४३ बाधितांना नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

पर्यावरणस्नेही प्रकल्प!

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ३४ टक्के इंधनाची तर ७० टक्के वेळेची बचत होणार आहे. शिवाय कोस्टल रोडमध्ये ७० हेक्टर एवढे हरीत क्षेत्र उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प पर्यावणस्नेही ठरणार आहे.

अशी मिळणार नुकसान भरपाई

- टीआयएसएस’च्या सर्वेक्षणानुसार बोटीचा मालक, बोटीवर काम करणारे खलाशी, तांडेल, हाताने मासे-शिंपल्या निवडणारे, किनार्‍यावर जाळीने मच्छिमारी करणारे अशी कॅटेगरी बनवण्यात आली आहे.

- प्रत्येकाला ऑक्टोबर २०१८ पासून काम संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीसाठी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

-पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर २०१८ ते २०२२, दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत आणि त्यानंतर पुढील एक वर्षे व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित कालावधीतील रक्कम दिली जाणार आहे.

-विशेष म्हणजे, हाताने मासे निवडणारे, किनाऱ्यावर जाळीने मच्छीमारी करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २०३० पर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

८ टक्के व्याज ही मिळणार!

कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाची सुरुवात ऑक्टोबर २०१८ मध्ये झाली. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला आता ५ वर्षें होत आली आहेत. त्यामुळे बोटीचे मालक, चालक समुद्र किनारी मासळी पकडणारे अशा १,३४३ बाधितांना नुकसान भरपाई देण्यासह नुकसान भरपाई बरोबर रकमेच्या तुलनेत ८ टक्के व्याज देण्यात येईल, असे ही अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in