

मुंबईच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) ने भारतातील पहिली सलग १५ डब्यांची 'इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट' (EMU) उपनगरी लोकल ट्रेन तयार केली आहे. ही नॉन-एसी लोकल पश्चिम रेल्वेला देण्यात आली असून, लवकरच ती मुंबई उपनगरी नेटवर्कमध्ये धावणार आहे. अशा १५ डब्यांच्या आणखी १२ EMU गाड्या टप्प्याटप्प्याने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर सुरू केल्या जाणार आहेत.
१८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहिली सलग १५ डब्यांची EMU लोकल चेन्नईहून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती ICF ने दिली. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील ही पहिलीच १५ डब्यांची EMU रेक असल्याचे नमूद करत, उपनगरी क्षमतेत वाढ आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे ICF ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
एकाच फेरीत ७,५५५ प्रवाशांची क्षमता
ही १५ डब्यांची लोकल सुरू झाल्यानंतर एका फेरीत सुमारे ७,५५५ प्रवासी प्रवास करू शकतील. सध्याच्या १२ डब्यांच्या लोकलच्या प्रवासी क्षमतेपेक्षा ही संख्या अधिक आहे. आतापर्यंत १२ डब्यांच्या लोकलला तीन डबे जोडून १५ डब्यांची लोकल धावात होती, परिणामी जागेच्या कमतरतेमुळे प्रवाशांची संख्या अपेक्षेप्रमाणे वाढत नव्हती. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, अधिकाऱ्यांच्या मते, या नव्या रेकमुळे पीक अवर्समधील प्रचंड गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे. मुंबईची उपनगरी रेल्वे व्यवस्था ही जगातील सर्वाधिक व्यस्त नेटवर्कपैकी एक मानली जाते.
पश्चिम आणि मध्य मार्गांवर अशाच आणखी १२ लोकल्स लवकरच
ICF ने मुंबई उपनगरी नेटवर्कसाठी आणखी १२ अशा १५ डब्यांच्या EMU गाड्या तयार करण्याची घोषणा केली आहे. या गाड्या टप्प्याटप्प्याने पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मार्गांवर सुरू केल्या जाणार आहेत. त्यासाठी निवडक स्थानकांवर प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम दोन्ही विभागांकडून सुरू करण्यात आले आहे.
नॉन-एसी लोकलमध्येही ऑटोमॅटिक दरवाजे
१५ डब्यांच्या लोकल्सव्यतिरिक्त ICF मुंबईसाठी दोन नॉन-एसी EMU ट्रेनसेट्स तयार करणार आहे, ज्यामध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर (ADC) प्रणाली असणार आहे. सध्या मुंबईत ऑटोमॅटिक दरवाजांची सुविधा फक्त एसी EMU सेवांमध्ये उपलब्ध आहे. नॉन-एसी लोकलमध्येही ही सुविधा आल्यास गर्दीमुळे होणारे अपघात आणि फुटबोर्डवरील जीवघेणा प्रवास थांबेल.
२३८ नव्या १२ डब्यांच्या रेक्सलाही मंजुरी
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने मुंबई उपनगरी नेटवर्कसाठी प्रत्येकी १२ डब्यांच्या २३८ EMU रेक्सना आधीच मंजुरी दिली आहे. अतिरिक्त १२ डब्यांच्या आणि नव्या १५ डब्यांच्या रेक्सच्या एकत्रित समावेशामुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील प्रवासी क्षमता, सुरक्षितता आणि एकूणच प्रवासाचा अनुभव लक्षणीयरीत्या सुधारेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.