मुंबईत ४६ अतिधोकादायक दरड प्रवण क्षेत्र; ७४ धोकादायक क्षेत्र, घाटकोपर विभागातील संख्या अधिक

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यादरम्यान धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींसोबतच टेकड्यांचा म्हणजेच दरड प्रवण क्षेत्राचा विषय ऐरणीवर येतो. मुंबईत एकूण २४९ धोकादायक दरड प्रवण क्षेत्र असल्याचे समोर आले आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पाहणीनुसार, २४९ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांपैकी ७४ ठिकाणे धोकादायक आणि ४६ ठिकाणे अतिधोकादायक श्रेणीत असल्याचे पालिकेकडून घोषित करण्यात आले आहे.
मुंबईत ४६ अतिधोकादायक दरड प्रवण क्षेत्र; ७४ धोकादायक क्षेत्र, घाटकोपर विभागातील संख्या अधिक
Published on

पूनम पोळ / मुंबई

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यादरम्यान धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींसोबतच टेकड्यांचा म्हणजेच दरड प्रवण क्षेत्राचा विषय ऐरणीवर येतो. मुंबईत एकूण २४९ धोकादायक दरड प्रवण क्षेत्र असल्याचे समोर आले आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पाहणीनुसार, २४९ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांपैकी ७४ ठिकाणे धोकादायक आणि ४६ ठिकाणे अतिधोकादायक श्रेणीत असल्याचे पालिकेकडून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई शहरातील ६, पश्चिम उपनगरातील ७ आणि पूर्व उपनगरातील ३३ ठिकाणांचा समावेश आहे. तर घाटकोपर विभागातील दरड प्रवण क्षेत्रांचा अधिक समावेश आहे.

मुंबईतील घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज, शिव येथील अन्टॉप हिल, चेंबूर-वाशीनाका, विक्रोळी पार्कसाईट, भांडुप, चुनाभट्टी-कुर्त्यातील विस्तीर्ण कसाई वाडा, आदी ठिकाणच्या डोंगरानजीक हजारो झोपड्या आहेत. काही कच्च्या तर काही पक्क्या बांधकाम केलेल्या या झोपड्या एकमेकांना आधार देत अनेक वर्षांपासून वसल्या आहेत. या झोपड्यांमध्ये लाखोंच्या संख्येने लोकांनी संसार थाटले आहेत. असे असले तरी, दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे डोंगर भागातील माती पोकळ होऊन भुस्कलन होणे, दरडी कोसळणे अशा घटना घडत असतात. मुंबई महापालिकेतर्फे या दरडप्रवण धोकादायक ठिकाणांना नोटीस बजावली जाते. सदर ठिकाण धोक्याचे आहे, तातडीने स्थलांतरित करावे, अशी नोटीस पालिकेचे अधिकारी झोपड्यांवर चिकटवून जातात.

पालिकेच्या नोटिशीकडे रहिवाशांचे दुर्लक्ष

पावसाळ्यादरम्यान अशा घटना घडू शकतात. यासाठी पालिकेच्या वतीने एप्रिल मे महिन्याच्या सुरुवातीलाच या भागातील लोकांना नोटिसा बजावण्यात येतात. मात्र, येथील रहिवाश्यांकडे पर्यायी जागा नसल्याने येथील लोक जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहतात. दरम्यान एखादी दुर्घटना झाल्यास येथे जीवित आणि वित्त हानी होण्याची दाट शक्यता असते. परंतु, पालिका किंवा संबंधित यंत्रणेने दिलेल्या नोटिशीनुसार घर खाली केल्यास घराला कायमचे मुकावे लागेल, अशी भावना या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये असते. त्यामुळे येथे वास्तव्यास असलेलले लोक या नोटीसकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अशी आहेत दरड प्रवण क्षेत्र

बाबुलनाथ येथील लॉयलका कंपाऊंड, सायन विभागातील सलामती हिल, काळाचौकी येथील जिजामाता नगर, शिवडी येथील न्यू शिवाजी नगर आणि बरादेवी, वरळी येथील आनंद नगर आणि अचानक नगर, लोअर परळ भागातील पोचखानवाला हिल रोड, जोगेश्वरी पूर्व येथील श्रीपुत नगर, जोगेश्वरी पश्चिम येतील बंदिवली हिल, अंधेरी येथील गिल्बर्ट हिल, गोरेगाव येथील राजीव गांधी नगर, मालाड पूर्व येथील रहेजा टाऊनशिप, कोकणी पाडा, कांदिवली पूर्व येथील वडारपाडा, कुर्ला पश्चिम येथील असल्फा हिल, मिलिंद नगर, नेताजी नगर, शास्त्री नगर, कुर्ला पूर्व येथिल कसाई वाडा, रेशमिका इस्टेट आणि नागोबा टेम्पल, चेंबूर येथील न्यू भारत नगर, गौतम नगर, घाटकोपर पश्चिम येथील वर्षा नगर, गजानन आणि सुदर्शन सोसायटी, साईकृपा, सोमेश्वर आणि कालभैरव सोसायटी, पंचशील आणि त्रिलोक सोसायटी, सहारा सोसायटी, संजय गांधी नगर, जय श्रीराम सोसायटी, राम नगर, श्री समर्थ आणि शिवशक्ती सोसायटी, राहुल नगर, श्री गर्जना सोसायटी १ आणि २ राहुल नगर, सिद्धेश्वर मित्र मंडळ, जय मल्हार नगर, जय आंबे माता सोसायटी, गणेश नगर, खन्डोबा टेकडी, सोनिया गांधी आणि आझाद नगर हिल क्रमांक २, भांडुप येथील तंजीपाडा परिसरातील साई निकेतन आणि शांती निकेतन सोसायटी, नवनाथ चाळ, ताजीवाडी, नाडार चाळ पत्रकार कंपाउंड, हनुमान नगर खदान, हनुमान टेकडी येथील हनुमान नगर आणि अमरतारा मित्र मंडळ, रमाबाई आंबेडकर नगर, विक्रोळी येथील सूर्या नगर, पवई येथील इंदिरा नगर, दुर्गा देवी वेल्फेअर सोसायटी आणि नेव्ही कंपाउंड, मुलुंड येथील पंचशील नगर, हनुमान पाडा.

logo
marathi.freepressjournal.in