मुंबई : गर्भधारणेच्या अवघ्या २३ आठवड्यांत, केवळ ६३६ ग्रॅम वजनासह जन्मलेल्या अद्वित पोकळे या चिमुकल्याने मृत्यूशी दिलेली झुंज अखेर जिंकली आहे. जन्मतःच फुफ्फुसे आणि शरीरातील महत्त्वाचे अवयव पूर्ण विकसित नसल्याने त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यातच गंभीर जीवाणू संसर्ग, मेंदूज्वर आणि डोळ्यांच्या आजाराने त्याच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल चार महिन्यांच्या उपचारांनंतर या चिमुकल्याला नवजीवन मिळाले. ४ नोव्हेंबर रोजी २.५४ किलो वजनासह त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
अप्पासाहेब पोकळे (२८) आणि मोहिनी पोकळे (२२) या दाम्पत्याच्या घरी ८ जुलै २०२६ रोजी अद्वितचा जन्म झाला. गर्भधारणेचे अवघे २३ आठवडे आणि चार दिवस पूर्ण झाले असताना त्याचा जन्म झाला. त्यामुळे त्याचे वजन केवळ ६३६ ग्रॅम होते. फुफ्फुसे आणि अन्य महत्त्वाचे अवयव पुरेसे विकसित झाले नसल्याने जन्मानंतर त्याला तातडीने विशेष उपचारांची गरज भासली. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर जन्माच्या सहाव्या दिवशी त्याला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संसर्गावरील उपचारांनंतर चांगला प्रतिसाद
रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. सुमेधा सुंदरराजू यांच्या मार्गदर्शनाखाली संसर्गावर प्रभावी प्रतिजैविके देण्यात आली. श्वसन, पोषण, शरीराचे तापमान आणि संसर्ग नियंत्रण यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. उपचारांना अद्वितने चांगला प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे जन्मानंतर १८व्या दिवशी त्याला आवश्यक असलेले संपूर्ण पोषण देणे शक्य झाले.
फुफ्फुसांच्या गंभीर समस्यांमुळे उपचार बनले आव्हानात्मक
अद्वितला सुरुवातीचे ४१ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर आणखी २३ दिवस श्वसनासाठी विशेष यंत्रणेचा आधार द्यावा लागला. हायलिन मेम्ब्रेन डिसीज आणि ब्रॉन्कोपल्मोनरी डिस्प्लेसिया यांसारख्या फुफ्फुसांशी संबंधित गंभीर समस्यांमुळे उपचार अधिक आव्हानात्मक झाले होते. त्यातच औषधांना दाद न देणाऱ्या क्लेब्सिएला जीवाणूंचा संसर्ग झाला. या संसर्गामुळे रक्तप्रवाहातून मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचून मेंदूज्वर झाला. त्यामुळे बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.