मुंबई : सात महिन्यांत अडीच लाख उंदरांचा खात्मा; लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी BMC च्या कीटक नाशक विभागाने कसली कंबर

लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्या कीटक नाशक विभागाने कंबर कसली आहे. दिवसा उंदरांना मारणे तितके शक्य होत नसल्याने रात्रीच्या वेळी मूषक संहारण मोहीम हाती घेतली आहे.
मुंबई : सात महिन्यांत अडीच लाख उंदरांचा खात्मा; लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी BMC च्या कीटक नाशक विभागाने कसली कंबर
Published on

मुंबई : लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेच्या कीटक नाशक विभागाने कंबर कसली आहे. दिवसा उंदरांना मारणे तितके शक्य होत नसल्याने रात्रीच्या वेळी मूषक संहारण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १ लाख ९८ हजार ८१८ उंदरांचा खात्मा केला आहे. तर जानेवारी ते १४ जुलैपर्यंत एकूण २ लाख ३९ हजार ५२७ उंदरांचा खात्मा केला आहे.

लेप्टोस्पायरोसिसला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उंदरांचा प्रादुर्भाव आढळणाऱ्‍या ठिकाणी विषारी गोळ्या टाकून, रात्रपाळी उंदीरनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांच्या आलेल्या तक्रारींनुसार पालिकेकडून कार्यवाही करण्यात येत आहे. उंदरांचा प्रजनन-दर, त्यांच्यामुळे संभाव्य रोग प्रसार आणि उंदरांमुळे होणारी नासधूस थांबावी यासाठी ‘मूषक नियंत्रण' उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. एक उंदीर मारण्यासाठी २० ते २५ रुपयांचा खर्च केला जात आहे. उंदरांपासून होणाऱ्या आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घर परिसर स्वच्छ राखावा, उंदीर वाढणार यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

असा होतो प्रसार

-उंदीर-घुशींमुळे होणाऱ्‍या रोगांमध्ये प्लेग व लेप्टोस्पायरोसिस या रोगांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘झिनॉपसिला चिओपिस’ या पिसवा उंदीर-घुशींच्या केसात आढळतात. या पिसवांमार्फत प्लेगची लागण होते. तर लेप्टोस्पायरोसिस जिवाणू अनेक प्रकारच्या चतुष्पाद प्राण्यांच्या मुत्राव्दारे जमिनीवर, अन्नपदार्थांवर अथवा पाण्यात मिसळले जाऊ शकतात.

-या चतुष्पाद प्राण्यांमध्ये उंदरांचाही समावेश होतो. लेप्टोस्पायरोसिसने बाधित असलेल्या प्राण्याचे मलमूत्र, माती, पाणी, अन्न, पेयजल आदींच्या संपर्कात माणूस आल्यास जखमेव्दारे अथवा तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसीसचे जिवाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात.

असे मारले उंदीर

विषारी गोळ्या घालून मारलेले उंदीर ——> १९८७६

पिंजरे लावून पकडून मारलेले उंदीर ——> २०८३३

रात्र पाळी ’मूषक संहारण’मध्ये मारले —> १९८८१८

एका वर्षात जोडीपासून १५ हजार उंदीर

सस्तन प्राण्यामध्ये मोडणार्‍या उंदीर किंवा घुशी यांचे आयुर्मान साधारणपणे १८ महिन्यांचे असते. गर्भधारणेनंतर साधारणपणे २१ ते २२ दिवसांत मादी उंदीर पिल्लांना जन्म देते. एका वेळेस साधारणपणे ५ ते १४ पिल्लांना ती जन्म देते. जन्म दिलेली पिल्ले ५ आठवड्यात प्रजननक्षम होऊन तीदेखील नव्या पिल्लांना जन्म देतात. यानुसार साधारणपणे एक वर्षात उंदराच्या एका जोडीमुळे अंदाजे १५ हजारपर्यंत नवीन उंदीर तयार होऊ शकतात.

logo
marathi.freepressjournal.in