Mumbai : एसी बसची दिवाळी भेट; नव्या कोऱ्या ४८ बस प्रवासी सेवेत, ४१ आसन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

मुंबईकरांच्या सार्वजनिक वाहतूक प्रवासात आता आधुनिकतेची भर पडणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ४८ नव्या इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस मुंबईच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
Mumbai : एसी बसची दिवाळी भेट; नव्या कोऱ्या ४८ बस प्रवासी सेवेत, ४१ आसन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
Mumbai : एसी बसची दिवाळी भेट; नव्या कोऱ्या ४८ बस प्रवासी सेवेत, ४१ आसन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
Published on: 

मुंबई : मुंबईकरांच्या सार्वजनिक वाहतूक प्रवासात आता आधुनिकतेची भर पडणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ४८ नव्या इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस मुंबईच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या नव्या बसमुळे गर्दीच्या मार्गांवर अधिक प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार असून ४१ आसन क्षमता असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

या ४८ बसचा पुरवठा ‘ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमार्फत करण्यात आला आहे. १२ मीटर लांबीच्या या बस भाडेतत्त्वावर चालविण्यात येणार आहेत. त्यांच्या समावेशामुळे बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर बसची संख्या ९८ वर पोहोचणार आहे.

मंगळवार मागाठाणे आगारात बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्या उपस्थितीत नव्या बसचे लोकार्पण करण्यात आले.

आरामदायी प्रवास

नव्या इलेक्ट्रिक डबलडेकर बसची सर्वांत मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांची प्रवासी क्षमता. एकाच बसमधून अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार असल्याने गर्दीच्या मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत बसमध्ये जागा मिळवण्यासाठी होणारी धावपळ कमी होण्याची अपेक्षा आहे. वातानुकूलित सुविधेमुळे उकाड्यातही प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे.

बसचा वापर अधिक कार्यक्षमतेने करता येणार

बसच्या प्रवेशासाठी स्वतंत्र दरवाजा देण्यात आला असून प्रवाशांना चढणे-उतरणे अधिक सोयीचे होणार आहे. बॅटरीचे वजन १६ टनांनी कमी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे तसेच बॅटरी बसच्या खालच्या भागात सुरक्षितपणे बसवण्यात आली आहे. सीसीएस-२ तंत्रज्ञानामुळे चार्जिंगचा वेग ५८ टक्क्यांनी अधिक असल्याने बसचा वापर अधिक कार्यक्षमतेने करता येणार आहे.

पाच मार्गांवर ४४ बस धावणार

एकूण ४४ बस मागाठाणे आगारातून पाच मार्गांवर चालविण्याचे नियोजन आहे. कांदिवली पूर्व बस स्थानक, संघर्ष नगर (चांदिवली), समर्थ नगर बस स्थानक (कांदिवली पूर्व) तसेच मागाठाणे आगाराशी संबंधित मार्गांवर या बस धावणार आहेत. याशिवाय बोरिवली पूर्व, ठाणे पूर्व आणि मीरा रोड पूर्व स्थानकांना जोडणाऱ्या मार्गांचाही विचार करण्यात आला आहे. दरम्यान, पीएम ई-ड्राइव्ह योजनेंतर्गत बेस्टसाठी १,५०० मिडी बस खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच २,४०० इलेक्ट्रिक वातानुकूलित बस खरेदीचा प्रस्ताव असून, त्यापैकी २,००० बस बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे नियोजन आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)