
मुंबई : गाड्यांचा तुटवडा आणि कमी फेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त असताना बेस्टच्या ५० नव्या इलेक्ट्रिक बस फायर सेफ्टी प्रणाली अभावी शिवाजीनगर डेपोत उभ्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्र सरकारच्या मोटर वाहन नियमांनुसार फायर डिटेक्शन ॲण्ड सप्रेशन सिस्टिम (एफडीएसएस) ही बसच्या एका विशिष्ट श्रेणीसाठी अनिवार्य आहे. बेस्टच्या ५० बसची दोन महिन्यांपूर्वी ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नोंदणी झाल्यानंतरही रस्त्यावर धावू शकत नाहीत, असे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, तपासणीदरम्यान या ५० बसमध्ये एफडीएसएस प्रणालीच बसवण्यात आली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या शिवाजीनगर डेपोत उभ्या करण्यात आल्या असून, सध्या तरी त्या प्रवासी सेवेत वापरता येणार नाहीत.
बेस्टने आधीच मोठ्या प्रमाणावर जुन्या बस स्क्रॅप केल्या असताना ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नवीन बस वेळेवर उपलब्ध झाल्या नाहीत. परिणामी, फ्रीक्वेन्सी कमी झाल्याबद्दल प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
गेल्या महिन्यात पीटीआयला ओलेक्ट्राच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, सामान्यतः कंपनी आपल्या उत्पादन युनिटमध्ये एफडीएसएस बसवते, पण सध्या बाजारात या प्रणालींचा तुटवडा आहे. ही प्रणालीनंतरही सहजपणे बसवता येत असल्यामुळे या बसेस त्याआधीच डेपोला पाठवण्यात आल्या, जेणेकरून नोंदणी व इतर औपचारिकता लवकर पूर्ण होतील, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
आम्हाला जूनच्या पहिल्या सहामाहीत एफडीएसएस प्रणाली मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या ५० बस डेपोत आहेत. येत्या २० दिवसांत ही प्रणाली बसवली जाईल. बेस्टच्या वेळापत्रकानुसार बस पुरवण्यास आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत, असे प्रवक्त्याने नमूद केले.
फायर अलार्म प्रणाली ही बसच्या इंजिन कंपार्टमेंटजवळ आग लागल्यास चालक आणि प्रवाशांना ध्वनी आणि दृश्य अलार्मद्वारे इशारा देते आणि धोका असल्याचे सूचित करते, असे निरीक्षक अधीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी त्यांच्या उत्तरात नमूद केले.
- १२ मीटर लांबीच्या ई-बस ओलेक्ट्राची उपकंपनी एव्हरी ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडकडून बेस्टला पुरवण्यात आल्या आहेत. बेस्टला २१०० इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्याच्या करारातील बेसेसपैकीच या ५० बसेस आहेत, असेही त्यांनी सांगितले.
- बस १८ मार्च ते १६ मे २०२५ दरम्यान वेगवेगळ्या तारखांना MH-01 (ईडब्ल्यू मालिका) नोंदणीसह ताडदेव आरटीओमध्ये रजिस्टर करण्यात आल्या आहेत. काही बस १६ मे नंतर माझगाव डेपो येथे आल्या असून, त्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.