

मुंबई : मलबार हिल येथील कमला नेहरू पार्कमधील मुंबईचे एक प्रमुख आकर्षण असलेल्या ‘म्हातारीचा बूट’ या वास्तूला ७४ वर्षांनंतर पुन्हा एकदा नवा साज चढवण्यात आला आहे. काळाच्या ओघात बदललेले बुटाचे मूळ स्वरूप आणि रंगरंगोटी पूर्ववत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत होती. या मागणीची दखल घेत महापालिकेच्या जल अभियंता विभागाने बुटाला व्हिंटेज लुक देत रंगरंगोटी आणि आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
दरम्यान, २०१७-१८ मध्येही या बुटाची देखभाल आणि रंगरंगोटी करण्यात आली होती. आता २०२६ मध्ये जल अभियंता विभागाकडून आवश्यक दुरुस्ती, रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईचे काम हाती घेण्यात आले. बुटाचा रंग बदलल्याने त्याचे मूळ सौंदर्य हरवल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती. १९५२-५३ मधील मूळ स्वरूपाप्रमाणेच बुटाला रंग देण्यात यावा, अशी त्यांची मागणी होती.
या मागणीचा विचार करून सहाय्यक अभियंता (परि.) जलकामे शहर-२ जल अभियंता विभाग आणि स्थानिक नगरसेवक सनी सानप यांच्या पुढाकाराने ही कामे करण्यात आली. कनिष्ठ वृक्ष अधिकारी सागर डोईफोडे आणि कनिष्ठ अभियंता पूजा कदम यांनी संयुक्तरीत्या बुटाला व्हिंटेज लुक देण्यासाठी रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईची कामे पूर्ण केली आहेत.
लहान मुलांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला हा ऐतिहासिक बूट लवकरच पुन्हा बच्चेकंपनीच्या सेवेत दाखल होणार असून, त्याच्या नव्या रूपामुळे कमला नेहरू पार्कच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
सोली आर्सीवाला यांची उभारणी
‘म्हातारीचा बूट’ ही वास्तू १९५२ मध्ये उभारण्यात आली. प्रसिद्ध इंग्रजी बालगीत ‘देअर वॉज अॅन ओल्ड वुमन हू लिव्ह्ड इन अ शू’ या गाण्यावरून या बुटाची संकल्पना साकारण्यात आली. या वास्तूची रचना तत्कालीन मुंबई मनपाचे पर्यावरण अधिकारी प्रा. सोली आर्सीवाला यांनी केली होती. प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या स्वभावामुळे त्यांनी या वास्तूवर स्वतःचे नाव कुठेही नमूद केले नव्हते. त्यामुळे अनेक वर्षे या आकर्षक वास्तूचे रचनाकार कोण, याची माहिती सर्वसामान्यांना नव्हती.