मुंबई : आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या ४३ वर्षीय नराधमाला विशेष पोक्सो न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायाधीश प्रिया बनकर यांनी आरोपी मोहन मुरगन याला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
धारावीतील मंदिराजवळ आठ वर्षांचा पीडित मुलगा घराजवळ खेळत होता. यादरम्यान आरोपी तेथे आला आणि त्याने त्याला खेळण्यासाठी मंदिरात बोलावले. पीडित मुलगा मंदिराच्या आवारात येताच आरोपीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर झालेल्या प्रकारची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र मुलगा भीतीखाली असल्याचे लक्षात येताच, पालकांनी त्याला विश्वासात घेतले आणि संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला.
या खटल्याची न्यायाधीश प्रिया बनकर यांच्या समोर सुनावणी झाली. न्यायालयाने घडलेल्या घटनेच्या धक्क्यामुळे पीडित मुलगा सामान्य जीवन जगू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत आरोपी मोहन मुरगन याला दोषी ठरवले. गुन्ह्यातील आरोपी मोहनचा सहभाग सिद्ध करण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रांजली जोशी यांनी अनेक साक्षी-पुरावे सादर केले. खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासले.