

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २,५५३ भाडेतत्त्वावरील बसेस आहेत. यापैकी १,६८५ बसेस सुस्थितीत आहेत. मात्र ८६८ बसेस नादुरुस्त असल्याची धक्कादायक माहिती बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी बैठकीत उघडकीस आणली. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसेस प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असून विविध अपघातात पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
बेस्ट समिती सदस्य अजय सिंह यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत भाडेतत्त्वावरील बसेसची काय अवस्था आहे, याकडे समितीचे लक्ष वेधले. तसेच बेस्टच्या कंत्राटी बसांची दुरुस्ती आणि नियमित देखभालीची जबाबदारी बेस्टच्या अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी अजय सिंह यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे. अलीकडील काळात बेस्टच्या कंत्राटी बसेसचे अपघात वाढले असून त्यामागे वेळेवर दुरुस्ती आणि योग्य देखभाल न होणे, हे एक महत्त्वाचे कारण असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंत्राटी बसेसच्या देखभालीची जबाबदारी थेट बेस्टच्या अनुभवी अभियांत्रिकी विभागाकडे देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मायनर व मेजर दुरुस्त्या करण्यात आल्या असून ८६८ पैकी आता ९४ बसेसच्या दुरुस्ती प्रगतिपथावर आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली.
भाडेतत्त्वावरील बसेसचे गेल्या सात महिन्यांत अनेक अपघात झाले असून पादचाऱ्यांच्या जिवावर बेतले आहे. भाडेतत्त्वावरील बसेसचे सतत अपघात होत असून याची चौकशी करण्यात यावी, असा पत्रव्यवहार २१ मे २०२६ रोजी बेस्ट उपक्रमाकडे केला होता. तब्बल तीन महिन्यांनंतर हरकतीच्या मुद्द्याचे उत्तर आले, परंतु मिनिट्सची नोंद काय ते बेस्टने दिलेले नाही.
“तीन महिने झाले कोणतीच कारवाई नाही, बस अपघातात लोक मृत्युमुखी पडत असून अधिकारी जबाबदार आहे की नाही,” असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला.
पाच हजार रुपये प्रतिदिन दंडाचे काय झाले?
बसेस नादुरुस्त, संपकाळात बसेस बंद पडल्या तर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. प्रतिदिन प्रतिबस ५ हजार रुपये दंड आकारण्यात येतो. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत किती कंत्राटी बस व्यवस्थापनाकडून दंड आकारण्यात आला याची माहिती द्यावी, अशी मागणी नांदगावकर यांनी यावेळी केली.
अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचे निर्देश
भाडेतत्त्वावरील बसेसचे अपघात वाढले असून अपघात टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने प्रयत्न करावेत. अधिकाऱ्यांनी एसी केबिनमध्ये बसू नये तर रस्त्यावर उतरून बसेसची तपासणी करावी, असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी दिले.