मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रमांतर्गत बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) कार्यवाही सुरू आहे. या कामासाठी १० हजार १११ हून अधिक बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) वारंवार सूचना देऊनही अद्याप रूजू झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे, रूजू न झालेल्या ९७९ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (बीएलओ) संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करावा, असे निर्देश सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. तसेच १३ आणि १४ जून रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे प्रशिक्षण आयोजित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार, जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आंचल गोयल आदी यावेळी उपस्थित होते. तसेच मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचे निवडणूक नोंदणी अधिकारी आणि संबंधित अधिकारी आदींचीही यावेळी उपस्थिती होती.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात मॅपिंग, तार्किक विसंगती आणि बीएलओंची अनुपस्थिती हे अत्यंत संवेदनशील मुद्दे आहेत. विहित वेळेत ही संपूर्ण प्रक्रिया योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे. या कामकाजात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हयगय होता कामा नये. त्यामुळे, सर्व निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी. १३ आणि १४ जून रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे प्रशिक्षण आयोजित करावे. सर्व निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षित करावे. जेणेकरून, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल, असेही शर्मा म्हणाले.
पालिकेचे ७,३०० कर्मचारी
मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ७ हजार ३०० कर्मचारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नेमले आहेत. तसेच, सुमारे १ हजार अतिरिक्त कर्मचारीही दिले आहेत. यासोबतच, वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभाग, आयकर विभाग, मुंबई विद्यापीठ, खाजगी विना अनुदानित शाळेचे शिक्षक आणि राज्य शासनाच्या विविध विभागांतील कर्मचारीही नेमण्यात आले आहेत. तथापि, मोठ्या प्रमाणात कर्मचारी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे, रुजू न झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी. त्यांच्यावर तत्काळ पोलिसांत गुन्हा नोंदवावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले.