३२० किमी वेगासाठी बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये बसवणार 'मूव्हेबल क्रॉसिंग'; टर्नआऊट तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, विश्वासार्हता वाढणार

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (एमएएचएसआर) कॉरिडॉरवर भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच ताशी ३२० किमी वेगाने गाड्या सुरक्षितपणे धावण्यासाठी हाय-स्पीड टर्नआऊट्सवर ‘मूव्हेबल क्रॉसिंग’ म्हणजेच ‘स्विंग-नोझ क्रॉसिंग’चा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे बुलेट ट्रेनची सुरक्षितता आणि विश्वासार्हता अधिक वाढणार आहे.

Published on

अभिषेक पाठक/मुंबई :

पारंपरिक स्थिर क्रॉसिंगच्या तुलनेत मूव्हेबल क्रॉसिंगमुळे क्रॉसिंग पॉईंटवर रुळांमधील अंतर (गॅप) उरत नाही. अतिवेगाने गाडी जात असताना पारंपरिक स्थिर क्रॉसिंगवरील अंतरामुळे चाकांवर आघात, कंपने आणि रुळांसह चाकांची जास्त झीज होण्याची शक्यता असते. नवीन तंत्रज्ञानानुसार, मूव्हेबल क्रॉसिंगचा भाग ‘स्विच रेल्स’सोबत सरकतो, ज्यामुळे ट्रेनसाठी एक अखंड आणि गुळगुळीत रेल्वे मार्ग तयार होतो.

ट्रेनची हालचाल सुरळीत होणार

हे तंत्रज्ञान मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्पाच्या तांत्रिक यंत्रणेचा भाग म्हणून लागू केले जात आहे. या कॉरिडॉरची रचना ताशी ३२० किमी वेगाने व्यावसायिक ऑपरेशन्स चालवण्यासाठी करण्यात आली असून अशा वेळी टर्नआऊट्सवरून (रूळ बदलताना) ट्रेनची हालचाल अत्यंत सुरळीत आणि अचूक होणे आवश्यक आहे.

एका टर्नआऊटसाठी दोन पॉइंट

प्रत्येक हाय-स्पीड टर्नआउटवर दोन स्वतंत्र पॉइंट मशिन्स बसवण्यात येतील. यातील पहिली मशीन स्विच रेल्सचे संचालन आणि लॉकिंग करेल तर दुसरी मशीन मूव्हेबल क्रॉसिंग नोझ चालवून सुरक्षितपणे लॉक करेल. या दोन्ही मशिन्स सिग्नलिंग आणि इंटरलॉकिंग सिस्टीमशी थेट जोडलेल्या असतील. दोन्ही भाग योग्य स्थितीत पोहोचून सुरक्षितपणे लॉक झाल्याची खात्री सिस्टीमकडून झाल्यानंतरच ट्रेनला टर्नआऊटवरून जाण्याची परवानगी दिली जाईल. याशिवाय स्विच रेल्स आणि मूव्हेबल क्रॉसिंगची स्थिती आणि लॉकिंग तपासण्यासाठी सिस्टीममध्ये अनेक प्रकारची तपासणी आणि सत्यापन यंत्रणा असतील.

अचूक लॉकिंग आणि पोझिशनिंग

प्रकल्प अहवालानुसार, या रचनेमुळे गाड्यांचा डायनॅमिक आघात, कंपने आणि आवाज कमी होईल तसेच रेल्वे ट्रॅक आणि रोलिंग स्टॉकची झीज कमी होण्यास मदत होईल. ताशी ३२० किमीच्या प्रचंड वेगामुळे निर्माण होणाऱ्या बलाचा विचार करता हाय-स्पीड पॉइंट मशिन्सचे अचूक लॉकिंग आणि पोझिशनिंग अत्यंत गरजेचे आहे.

हा एक मोठा तांत्रिक बदल

भारतातील पारंपरिक रेल्वे मार्गांवर वापरल्या जाणाऱ्या फिक्स-क्रॉसिंग टर्नआउट्सच्या तुलनेत मूव्हेबल क्रॉसिंगचा वापर हा एक मोठा तांत्रिक बदल मानला जात आहे. बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर टर्नआऊट्सवरून ट्रेनची वाहतूक सुरक्षित ठेवणे, प्रवासाचा दर्जा टिकवणे आणि देखभालीचा खर्च कमी करणे यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in