मुंबई : मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील घणसोली ते शीळफाटा दरम्यान ४.८८ किलोमीटर अंतराचा बोगदा शनिवारी पूर्ण करण्यात आला. या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२७मध्ये, दुसरा टप्पा २०२८ आणि अखेरचा बीकेसीपर्यंतचा तिसरा टप्पा २०२९ मध्ये पूर्ण होणार आहे. या मार्गावर प्रथम बुलेट ट्रेन गर्दीच्या वेळी अर्धा तासाच्या अंतराने चालविण्यात येणार असून याचे भाडे मध्यमवर्गीयांच्या आवाक्यातील असेल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी दिली.
प्रकल्प सुरू होताच मुंबई ते अहमदाबाद प्रवास २ तास ७मिनिटात पूर्ण होणार आहे. बुलेट ट्रेन सुरू झाल्यावर गर्दीच्या वेळी सुरुवातीला अर्धा तास अंतराने चालविण्यात येणार आहे. यानंतर बुलेट ट्रेन १० मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येईल.
बीकेसी ते शीळफाटा दरम्यानचा प्रकल्पातील २१ किलोमीटरचा मार्ग भुयारी असणार आहे. हे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात येत आहे. कंपनीने निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा कमी कालावधीत विविध आव्हानांना सामोरे जाऊन घणसोली ते शीळफाटा दरम्यानचा ५ किलोमीटर अंतराचा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धत (एनएटीएम) वापरून शनिवारी पूर्ण केला. बोगद्याचे काम मे २०२४ मध्ये तीन ओपनिंगद्वारे सुरू झाले आणि सलग बोगद्याच्या पहिल्या
२.७ किमी भागाचे पहिले ब्रेकथ्रू ९ जुलै २०२५ रोजी पूर्ण झाले. या ब्रेकथ्रूसह, सावली शाफ्टपासून शीळफाटा येथील बोगद्याच्या पोर्टलपर्यंतचा ४.८८१ किमी लांबीचा सलग बोगदा शनिवारी पूर्ण झाला. प्रकल्पातील उरलेला १६ किमीच्या बोगद्याचे खोदकाम टनल बोअरिंग मशिन्स (टीबीएमएस) वापरून पूर्ण करण्यात येणार आहे.
बुलेट ट्रेनचे तिकीट मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात असणारे असेल. कमी पैशात नागरिकांना मुंबई-अहमदाबाद प्रवास करता येईल यासाठी कोणत्याही आरक्षणासाठी थांबण्याची गरज भासणार नाही.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्ण
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुंबईतील कामाला लवकरच गती येणार आहे. भुयारीकरणासाठी आवश्यक असलेले टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) मुंबईत लवकरच दाखल होणार असून ते शाफ्टच्या ठिकाणी बसविण्यात आल्यानंतर पुढील महिन्यापासून भुयारीकरणाच्या कामाला वेग येणार आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पातील बिकेसी ते शीळफाटा दरम्यान २१ किलोमीटरचा मार्ग भुयारी असणार आहे. यापैकी घणसोली ते शीळफाटा दरम्यानचा सुमारे ५ किलोमीटर अंतराचा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीने (एनएटीएम) तयार करण्यात आला आहे. ही पद्धत वेळखाऊ असल्याने या प्रकल्पातील घणसोली ते बीकेसीपर्यंत बोगदा खोदण्याचे काम टीबीएम मशीनमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी चीनमधून टीबीएम मशिन्स मागविण्यात आल्या आहेत.
नव्या नॉन-एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे
उपनगरीय प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय रेल्वेने सर्व नव्याने बांधलेल्या लोकल गाड्या - ज्यामध्ये नॉन-एसी लोकलचा समावेश आहे -स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी ही घोषणा केली.
दरवर्षी, गर्दीच्या, चालत्या गाड्यांमधून पडून अनेक प्रवासी मरतात. स्वयंचलित दरवाजे हा उपाय आहे, असे मंत्री म्हणाले. वैष्णव यांनी सांगतिले की, प्रवाशांची सुरक्षिततेसाठी, विद्यमान लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची प्रणालीचे काम करत आहोत. सध्याच्या ताफ्यात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असेही ते म्हणाले.