

मुंबई : ५०८ किलोमीटर लांबीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे नागरी बांधकाम आणि रूळ अंथरण्याचे काम वेगाने सुरू असतानाच, आता या मार्गाच्या वीजेच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. आता बुलेट ट्रेनसाठी हायस्पीड वीज प्रणाली मिळणार आहे.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एन एचएसआरसीएल) दिलेल्या माहितीनुसार, ३२० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनला अखंड वीज पुरवठा करण्यासाठी देशातील पहिली उच्च क्षमतेची २×२५ केव्ही ओव्हरहेड ट्रॅक्शन सिस्टिम बसवली जात आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचे विजेचे घटक भारतातच तयार केले जात असल्याने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेलाही मोठा हातभार लागत आहे.
या संपूर्ण वीजपुरवठा जाळ्यासाठी राष्ट्रीय ग्रिडमधून वीज मिळवून ती ग्रीड सबस्टेशनद्वारे महाराष्ट्र आणि गुजरातमधील १४ ट्रॅक्शन सबस्टेशनना पुरवली जाईल. यातील ५ ट्रॅक्शन सबस्टेशन महाराष्ट्रात (मुंबई, ठाणे, विरार, बोईसर आणि ठाणे डेपो) तर ९ गुजरातमध्ये उभारली जात आहेत. वीजपुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये आणि बिघाड त्वरित वेगळा करता यावा, यासाठी ३१ स्विचिंग पोस्ट तयार केले जाणार आहेत. याशिवाय स्थानके, सिग्नल यंत्रणा आणि देखभाल सुविधांना वीज देण्यासाठी १६ वितरण सबस्टेशन उभारले जातील.
डेपोसह १,१२५ ट्रॅक किलोमीटर अंतरावरील या ओव्हरहेड वीज यंत्रणेला आधार देण्यासाठी सुमारे २२,००० स्टीलचे खांब (मॅस्ट्स) आणि २५,७०० हून अधिक कॅन्टिलिव्हर असेंब्ली बसवण्यात येत आहेत. अत्यंत वेगात धावणाऱ्या बुलेट ट्रेनला अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी ही प्रगत कंपाऊंड कॅटेनरी सिस्टिम भारतात आता पहिल्यांदाच वापरली जात आहे.
सर्व घटक देशांतर्गत तयार केले जाणार
या प्रकल्पातील ट्रान्सफॉर्मर्स, क्रॉस आर्म्स, फिडर वाईर्स आणि अनेक इलेक्ट्रो-मेकॅनिकल घटक आता देशांतर्गत तयार केले जात आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व १४ ट्रॅक्शन सबस्टेशनमध्ये भूकंप शोधणारे सिस्मोटेस्ट लावले जाणार आहेत. भूकंपीय हालचाली जाणवताच ही यंत्रणा तातडीने सुरक्षिततेची पावले उचलेल. महाराष्ट्र आणि गुजरात मिळून एकूण २८ सिस्मोटेस्ट बसवले जातील, तर संपूर्ण वीज जाळ्यावर मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून २४ तास लक्ष ठेवले जाईल.