Mumbai : बुलेट ट्रेनमध्ये खाण्यापिण्याच्या सेवेसाठी व्हेंडिंग मशीनचा पर्याय

मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवाशांना खाण्यापिण्याच्या सुविधांसाठी पारंपरिक कॅटरिंग सेवेऐवजी ‘ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन’वर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे.
Mumbai : बुलेट ट्रेनमध्ये खाण्यापिण्याच्या सेवेसाठी व्हेंडिंग मशीनचा पर्याय
IANS
Published on

अभिषेक पाठक/मुंबई

मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये प्रवाशांना खाण्यापिण्याच्या सुविधांसाठी पारंपरिक कॅटरिंग सेवेऐवजी ‘ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन’वर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे. या मार्गावरील प्रवासाचा कमी वेळ आणि गाड्यांची जास्त वारंवारता लक्षात घेता ‘नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ व्हेंडिंग आधारित सेवा मॉडेलचा गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या सूत्रांनी दिली.

ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या हाय-स्पीड ट्रेनमध्ये स्वतंत्र पॅन्ट्री किंवा ऑनबोर्ड कॅटरिंगची व्यवस्था करणे व्यवहार्य ठरणार नाही, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. तथापि, प्रवाशांना सोयीस्कर सेवा मिळण्यासाठी कॉर्पोरेशन अजूनही विविध पर्यायांचे मूल्यांकन करत असून सध्या व्हेंडिंग मशीन हा एक पसंतीचा पर्याय असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या स्वयंचलित मशीनद्वारे प्रवाशांना प्रवासादरम्यान पेये आणि पॅकबंद अन्नपदार्थ उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. ऑनबोर्ड किचन आणि कॅटरिंग कर्मचाऱ्यांमुळे निर्माण होणारी आव्हाने कमी करून ही यंत्रणा जलद सेवा देऊ शकते, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एकूण ५०८ किलोमीटर लांबीचा हा बुलेट ट्रेन कॉरिडॉर महाराष्ट्र आणि गुजरातला १२ स्थानकांद्वारे जोडणार असून, यामुळे दोन्ही राज्यांमधील आंतरशहर प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा गुजरातमधील सुरत ते वापी दरम्यानच्या १०० किलोमीटर अंतरावर १५ ऑगस्ट २०२७ रोजी सुरू होणार आहे.

दररोज दोन्ही बाजूंनी ट्रेनच्या ७० फेऱ्या

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बांधकाम वेगाने सुरू असून आतापर्यंत सुमारे ३४९ किलोमीटरचे मार्गिका काम आणि ४४३ किलोमीटरचे खांबांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच १७ नदी पुलांसह इतर पूल तयार असून मुंबई भागात भूमिगत कामासाठी दोन बोगदा यंत्रे तैनात करण्यात आली आहेत. ही बुलेट ट्रेन सेवा दररोज दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ३५ अशा एकूण ७० फेऱ्या मारेल आणि गर्दीच्या वेळी दर २० मिनिटांनी ट्रेन धावणार असल्याने ही देशातील सर्वाधिक वारंवारता असलेली लांब पल्ल्याची रेल्वे सेवा ठरेल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in