मुंबई : आधीच नालेसफाईच्या कामाला उशीर, त्यात उपसा केलेल्या गाळावर प्रक्रिया न करणे, संथगतीने कामे करणे अशा प्रकारच्या त्रुटी कामात आढळून आल्या. विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आल्याने संबंधित कंत्राटदारांना ९ कोटी २५ लाख ८३० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम कंत्राटदारांच्या देयकातून वसूल केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ही कारवाई केली आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मिठी नदी आणि मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो, तर विभाग (वॉर्ड) पातळीवर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. नैसर्गिक नाले, पावसाळी गटारे, भुयारी गटारे, चेंबर, ढापे उघडून स्वच्छ करण्यात येतात. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यास मदत होते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून गाळ उपशाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात येते.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीची अंमलबजावणी करताना जी छायाचित्रे आणि चित्रफिती अपलोड केले जातात, त्या सगळ्यांची ए. आय. प्रणाली पाहणी (screen) करते. तसेच त्यातील त्रुटी शोधून काढते. या त्रुटी शोधून काढण्यासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत. वजन काट्यावर जेव्हा वाहन वजनासाठी येते, त्यावेळी ताडपत्री हटवली जात आहे (Tarpulin किंवा नाही Detection), एकाच प्रतिमेचा पुनर्वापर अथवा प्रतिमांमधील विसंगती, वाहनातील गाळाची विल्हेवाट लावताना त्यामधून उडणाऱ्या धुळीच्या प्रमाणाचे निरीक्षण, आवश्यक छायाचित्रे उपलब्ध नसणे प्रत्यक्ष तपासणी, गाळ उतरवण्याच्या कामांच्या चित्रफिती अपलोड न करणे आणि नोंदणीकृत वाहने किंवा वर्ककोड आणि प्रत्यक्ष कामातील तपशीलामध्ये विसंगती आढळणे या प्रमुख बाबींच्या कमतरता, अनुषंगाने त्रुटी शोधण्यात आल्या. याखेरीज संयंत्रे, यंत्रसामग्री व वाहनांची अपुरी उपलब्धता, मनुष्यबळाची कामगारांना सुरक्षा साधनांचा पुरवठा न करणे, उपसलेल्या गाळावर विहित पद्धतीने प्रक्रिया न करणे तसेच कामे संथ गतीने करून निर्धारित वेळापत्रकाचे पालन न करणे, अशा विविध प्रकारच्या त्रुटी आढळल्या.
मोठे व लहान नाले असा आकारला दंड !
एआय आधारित आढळलेल्या त्रुटींद्वारे ८ कोटी ९९ लाख २६ हजार ८३० रुपये दंड आकारण्यात आला आहे. मोठे नाले (१ कोटी ३९ लाख ३९ हजार ३८० रुपये), लहान नाले (६ कोटी ११ लाख ८६ हजार ९५० रुपये) आणि मिठी नदी (१ कोटी ४८ लाख ५०० रुपये) अशी दंड रकमेची विभागणी आहे. प्रत्येक त्रुटीयुक्त फेरीसाठी १ हजार रुपयेप्रमाणे २६ लाख ४६ हजार रुपयांचा अतिरिक्त दंड आकारण्यात आला आहे.