हवेची गुणवत्ता सुधारणार; मियावाकी वन ते विविध प्रजातींची झाडांचा बहर

पालिकेचा पर्यावरण विभागाकडून १२ कोटींचा खर्च, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालिकेच्या उद्यान विभागाचा अँक्शन प्लॅन
हवेची गुणवत्ता सुधारणार; मियावाकी वन ते विविध प्रजातींची झाडांचा बहर

खालावलेल्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईत तब्बल १ लाख २५ हजार चौरस मीटर जागेवर मियावाकी वन, विविध प्रजातींची झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी झोन २ ते ७ मध्ये एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार असून यासाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

बदलत्या वातावरणामुळे मुंबईतील प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईच्या प्रदूषणास सुरु असलेली चार हजार बांधकामे कारणीभूत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबई प्रदूषण मुक्तीसाठी मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, बांधकामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित विकासक अथवा कंत्राटदावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.

१ लाख २५ हजार चौरस मीटर जागेवर हिरवळ निर्माण करण्यासाठी झोन २ ते झोन ७ दरम्यान एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. या झोनमधील ८९ प्लाॅटवर हिरवळ निर्माण करणे आणि पुढील तीन महिने देखभाल करणे ही जबाबदारी संबंधित एजन्सीची असणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून, पात्र एजन्सीना काम देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, सन २०२१-२२ मध्ये रस्त्यालगत तसेच महापालिकेच्या अखत्यारित उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांवर ४० हजार २३ वृक्षांची लागवड केली आणि सन २०२२-२३ मध्ये २५ हजार झाडे लागवडीचे लक्ष्य गाठले. सन २०११-१२ आणि सन २०२१-२२ मधील झाडांची एकूण आकडेवारी पाहता दहा वर्षांमध्ये केवळ १० लाख झाडांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येते. यामध्ये मुलुंड टी वॉर्डमध्ये केवळ ८ हजार एवढीच झाडे वाढली आहेत. २०११-१२ मध्ये मुलुंडमध्ये ७६ हजार २०९ एवढी झाडे होती आणि सन २०२१-२२ मध्ये या झाडांची संख्या ८४ हजार १८७ एवढी झाली. सध्या एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत, त्यात पश्चिम उपनगरांमध्ये १२ लाख २१ हजार ७३७ आणि पूर्व उपनगरांमध्ये १० लाख ३४ हजार ९५७ एवढी झाडे आहेत, तर शहरांमध्ये ७ लाख १८ हजार ५८९ एवढी झाडे आहे. तर मियावकी पध्दतीने संपूर्ण मुंबईत मागील वर्षांपर्यंत २ लाख ६० हजार ४९५ एवढी झाडे लावली गेली आहेत. त्यात पूर्व उपनगरांमध्येच सव्वा दोन लाख झाडे लावली गेली आहेत. तर पश्चिम उपनगरांमध्ये ८ हजार आणि शहरांमध्ये सुमारे १५ हजार एवढी मियावकी झाडे लावली गेली आहेत.

"मुंबई प्रदूषण मुक्तीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असून, मुंबईतील उद्यान, मनोरंजन मैदान, मोकळे भूखंड अशा ८९ प्लाॅटवर मियावाकी वन विकसीत करणे व विविध प्रजातींची झाडांची लागवड करणे हा मुख्य उद्देश आहे."

-जितेंद्र परदेशी, अधीक्षक, उद्यान विभाग, मुंबई महापालिका

सन २०११-१२ : एकूण झाडांची संख्या १९ लाख १७ हजार ८४४

सन २०२१-२२ : एकूण झाडांची संख्या २९ लाख ७५ हजार २८३

मुंबईतील एकूण झाडे : २९ लाख ७५ हजार २८३

शहर : ७ लाख १८ हजार ५८९

पूर्व उपनगरे : १० लाख ३४ हजार ९५७

पश्चिम उपनगरे : १२ लाख २१ हजार ७३७

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in