‘आयआयटी’चे हवामान शास्त्रज्ञ अंशुमन मोदी यांचा आरोप; मुंबईच्या अतिखराब हवेला बांधकाम, वाहन प्रदूषण जबाबदार

मुंबई व उपनगरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांची कामे, इमारतींचे बांधकाम व वाहनांच्या प्रदूषणामुळे शहरातील हवा ‘अतिखराब’ झाली आहे, असे आयआयटी, मुंबईचे हवामान शास्त्रज्ञ अंशुमन मोदी यांनी सांगितले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई व उपनगरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांची कामे, इमारतींचे बांधकाम व वाहनांच्या प्रदूषणामुळे शहरातील हवा ‘अतिखराब’ झाली आहे, असे आयआयटी, मुंबईचे हवामान शास्त्रज्ञ अंशुमन मोदी यांनी सांगितले.

रविवारी मुंबईचा सरासरी ‘एक्यूआय’ १०४ होता, जो ‘मध्यम’ श्रेणीत मोडतो. मात्र, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्ससारख्या (बीकेसी) काही भागांमध्ये एक्यूआय ‘गंभीर’ श्रेणीत नोंदवला गेला.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई’चे हवामान शास्त्रज्ञ अंगशुमान मोदी यांनी ‘एक्यूआय’ वाढीसाठी मुख्यत्वे बांधकामांची धुळ आणि वाहन प्रदूषणाला जबाबदार धरले.

मुंबई आणि उपनगरात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. यात अनेक मेट्रो मार्ग, रस्ते, पूल आणि इमारत बांधकामे सुरू आहेत. झोपड्या, चाळी आणि जुन्या गिरण्या यांची जागा गगनचुंबी इमारती घेत आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबईच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनीही शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर कामांमुळे ‘एक्यूआय’ बिघडत असल्याचे नमूद केले. येथे हवामानशास्त्रीय घटकही महत्त्वाचे ठरतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बेकरी आणि शव दहन भूमीना स्वच्छ इंधन वापरण्यास भाग पाडणे, इलेक्ट्रिक बसेसचा वापर, बांधकाम अवशेषांचे वैज्ञानिक व्यवस्थापन, रस्त्यांवरील धूळ नियंत्रित करण्यासाठी पाण्याच्या फवारणी करणाऱ्या यंत्रांचा वापर करण्यात येत आहे.

गतवर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबई मनपाने २८ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. बांधकामस्थळी धूळ कमी करण्यासाठी धातूचे कुंपण आणि हिरव्या जाळ्या लावणे, नियमित पाण्याची फवारणी करणे, बांधकाम अवशेषांचे योग्य संग्रहण व वाहतूक, वायू गुणवत्ता मोजणारी उपकरणे बसवणे आणि धूर शोषण प्रणाली उभारणे यांचा समावेश होता.

‘एक्यूआय’ वाढत असल्याने मुंबई मनपाने ५३ बांधकाम प्रकल्पांना नोटीस देत त्यांच्या कामावर बंदी घातली. यात सिद्धार्थ नगर (१७), माझगाव (५) आणि मालाड (प.) येथील ३१ बांधकांमांचा समावेश आहे.

मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी गुरुवारी बांधकामस्थळी बसवलेली सेन्सर आधारीत ‘एक्यूआय’ मॉनिटरिंग प्रणालीच्या स्थितीची पाहणी केली. मुंबईत एकूण ६६२ अशी यंत्रे बसवली असून आणखी २५१ यंत्रे बसवण्याचे काम सुरू आहे. यापैकी ४०० यंत्रे व्यवस्था ‘एकत्रित डेटा डॅशबोर्ड’शी जोडल्या आहेत. मात्र ११७ यंत्रे निष्क्रिय आढळली. या निष्क्रीय सेन्सर्सवर भरारी पथकांमार्फत कठोर कारवाई करण्यात आली आहे, असा इशारा जोशी यांनी दिला आहे.

प्रदूषणाला हिवाळ्याचा हातभार

हिवाळ्यातील संक्रमण काळात तापमानात बदल होतात. स्वच्छ आकाश, जमिनीचे झपाट्याने थंड होणे आणि कमी वेगाचे वारे यामुळे तापमान उलटफेराची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे थंड हवा उष्ण हवेखाली अडकते आणि प्रदूषकांचा प्रसार रोखला जातो. तथापि, मुंबईसारख्या महानगरांमध्ये दाट आणि उंच बांधकामे हवेच्या नैसर्गिक वहनात अडथळे निर्माण करतात, असेही नायर यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in