Mumbai Air Pollution : मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ; CREA संस्थेच्या अहवालातून पोलखोल

मुंबईतील सायन, देवनार, कांदिवली, बोरिवली, माझगाव आदी भागातील हवा चेन्नई, कोलकाता या शहरांपेक्षा जास्त प्रदूषित झाल्याची धक्कादायक बाब अहवालातून समोर आली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला येथील विकासक आणि पालिकेचे संबंधित अधिकारी कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. तसेच, यापुढे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात आणि त्यानंतरही प्रदूषण वाढल्यास संबंधित वॉर्डातील सहाय्यक आयुक्त यांना जबाबदार ठरवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (सीआरईए) या संस्थेने गेल्या सहा महिन्यातील देशातील २३९ शहरातील हवेची गुणवत्ता तपासून त्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये, मुंबईतील हवेत २.५ या विषारी कणांचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय मानकांपेक्षा कमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुंबईतील सायन, देवनार, कांदिवली, बोरिवली, माझगाव आदी भागातील हवा चेन्नई, कोलकाता या शहरांपेक्षा जास्त प्रदूषित झाल्याची धक्कादायक बाब अहवालातून समोर आली आहे.

या अहवालातील माहितीची गंभीर दखल भाजपचे मुंबई उपाध्यक्ष आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी घेतली आहे. “२०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत, संपूर्ण मुंबईने हवेतील सरासरी विषारी पीएम २.५ पातळी राष्ट्रीय मानकापेक्षा कमी नोंदवली, ही खूपच चिंताजनक बाब आहे. मुंबई महापालिकेने शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी काही नियम केले होते. मात्र अनेक विकासकांनी इमारतींची बांधकामे करताना नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे प्रदूषण वाढीस लागले. हवेची गुणवत्ता ढासळली. सर्वात वाईट हवेच्या गुणवत्तेचे हेच मुख्य कारण आहे. प्रदूषण रोखण्याची मुख्य जबाबदारी महापालिकेने ज्या संबंधित अधिकाऱ्यांवर टाकली होती, त्यांनी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रदूषण वाढले आणि मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे,” असे आरोप रवी राजा यांनी केले आहेत.

प्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक

यापुढे महापालिकेने मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करावी आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यानंतरही हवेची गुणवत्ता राष्ट्रीय मानकांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यास महापालिका आयुक्तांनी संबंधित वार्डातील सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरावे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी रवीराजा यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in