फटाक्यांच्या आतषबाजीने मुंबईचा श्वास कोंडला; लक्ष्मीपूजनानंतर प्रदूषणात मोठी वाढ; सरासरी AQI १७१, आठ ठिकाणी हवा 'खराब' श्रेणीत

लक्ष्मीपूजनानिमित्त रविवारी मुंबईकरांनी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली. मात्र, या आतषबाजीचा परिणाम दुसऱ्याच दिवशी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर झाला. फटाक्यांच्या धुरामुळे शहरातील प्रदूषणात मोठी वाढ झाली असून, सोमवारी सकाळी नऊ वाजता मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १७१ वर पोहोचला.
फटाक्यांच्या आतषबाजीने मुंबईचा श्वास कोंडला; लक्ष्मीपूजनानंतर प्रदूषणात मोठी वाढ; सरासरी AQI १७१, आठ ठिकाणी हवा 'खराब' श्रेणीत
Published on: 

मुंबई : लक्ष्मीपूजनानिमित्त रविवारी मुंबईकरांनी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली. मात्र, या आतषबाजीचा परिणाम दुसऱ्याच दिवशी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर झाला. फटाक्यांच्या धुरामुळे शहरातील प्रदूषणात मोठी वाढ झाली असून, सोमवारी सकाळी नऊ वाजता मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १७१ वर पोहोचला. विशेष म्हणजे, शहरातील आठ ठिकाणी एक्यूआय २०० च्या पुढे गेल्याने तेथील हवा खराब श्रेणीत नोंदवण्यात आली.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी एक वाजता मुंबईचा एक्यूआय १३१ होता. समुद्राकडून वाहणाऱ्या जोरदार सुरू वाऱ्यांमुळे त्यावेळी प्रदूषकांचे प्रमाण तुलनेने कमी राहिले होते. मात्र, संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी राहिल्याने हवेत धूर आणि सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण वाढले. विशेषतः पीएम २.५ या सूक्ष्म कणांमुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

प्रदूषणाचा परिणाम दुसऱ्या दिवशीही कायम

प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने शहरातील सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये रात्रीच्या वेळी धूळ नियंत्रणासाठी फवारणी आणि पाण्याचे फवारे मारणारी वाहने तैनात केली आहेत. मात्र, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाचा परिणाम दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. त्यामुळे सण साजरा करताना पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचाही विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)