झाडे लावून मुंबईची हवा शुद्ध होणार नाही, बसेस वाढवा; प्रवीणसिंह परदेशी यांचा महापौरांना सल्ला

जगातील कोणत्याही महानगरापेक्षा मुंबईत प्रति चौरस किलोमीटर जास्त झाडे आहेत. तरीही मुंबईची हवा देशातील सर्वाधिक प्रदूषित हवेपैकी एक आहे.
झाडे लावून मुंबईची हवा शुद्ध होणार नाही, बसेस वाढवा; प्रवीणसिंह परदेशी यांचा महापौरांना सल्ला
झाडे लावून मुंबईची हवा शुद्ध होणार नाही, बसेस वाढवा; प्रवीणसिंह परदेशी यांचा महापौरांना सल्ला
Published on: 

विजय गायकवाड

मुंबई : जगातील कोणत्याही महानगरापेक्षा मुंबईत प्रति चौरस किलोमीटर जास्त झाडे आहेत. तरीही मुंबईची हवा देशातील सर्वाधिक प्रदूषित हवेपैकी एक आहे.

झाडे लावून मुंबईची हवा शुद्ध होणार नाही, बसेस वाढवा, असा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्र) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांनी गुरुवारी जागतिक महापौर परिषदेत दिला.

‘कितीही झाडे लावली तरी मुंबईचा प्रश्न सुटणार नाही. लंडनमध्ये आपल्यापेक्षा खूप कमी झाडे आहेत, पण तिथली हवा स्वच्छ आहे. आपण मात्र अनारोग्यकारक शहर बनलो आहोत," असे परदेशी म्हणाले. याचे कारण वाहने आहेत. उत्पन्न वाढले तशा खासगी गाड्या वाढल्या, पण सार्वजनिक वाहतुकीत तितकी गुंतवणूक झाली नाही. ब्रिटिश काळात लोकल आणि बेस्टवर शहर चालायचे. आज सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण त्यापेक्षाही कमी झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

हवामान संकट आणि शहरे या विषयावरील सत्रात त्यांनी मांडलेले बहुतेक मुद्दे नेहमीच्या समजुतीच्या उलट होते. ‘सहज सुचणाऱ्या उपायांनी प्रश्न सुटले असते, तर ते आतापर्यंत सुटले असते,’ असे ते म्हणाले.

२० हजार बसेस उभ्याच

मुंबईला आणखी २० हजारांहून अधिक बसेसची गरज आहे. पण त्या विकत घ्यायची गरज नाही, असे परदेशी म्हणाले. शाळा आणि कंपन्यांच्या जवळपास तितक्याच बसेस सकाळची आणि संध्याकाळची फेरी सोडता दिवसभर उभ्या असतात. त्या मधल्या वेळात ठराविक मार्गांवर चालवण्यासाठी त्यांना मोफत परवाना द्यावा, असे त्यांनी सुचवले.

जमीन आहे, पण वाया जाते

मुंबईच्या ४७५ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ७० टक्के भाग जंगल, खारफुटी, नद्या आणि किनारपट्टीचा आहे. तिथे बांधकाम करता येत नाही. उरलेल्या ३० टक्क्यांतच सगळ्यांना राहावे लागते. मुंबईत रस्त्यांखाली फक्त ११ टक्के जमीन आहे, तर मुंबईपेक्षा दाट असलेल्या न्यूयॉर्कमध्ये हे प्रमाण ३३ टक्के आहे, असेे ते म्हणाले.

निम्मे पाणी वाचेल

मुंबईसाठी नवी धरणे शोधण्याऐवजी असलेल्या पाण्याचा पुनर्वापर करा, असे परदेशी म्हणाले. हे पाणी फ्लशिंगला वापरले की प्रक्रिया नीट न झाल्यास रहिवासीच लगेच तक्रार करतील आणि प्रकल्प दुरुस्त करून घेतील. यामुळे निम्मे पाणी वाचेल, असे त्यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)