Mumbai Weather Update : ‘अस्वास्थ्य’कारी प्रदूषण! वडाळा, कुलाबा सर्वाधिक प्रभावित; शहरावर थंड वारा, धुक्याची चादर

मुंबईतील थंड वाऱ्याने रहिवाशांना हिवाळ्याची चाहूल लागली. मात्र, शहरावर पसरलेल्या धुक्याच्या थराने वायुप्रदूषणाचे चिंताजनक चित्र समोर आले आहे.
Mumbai Weather Update : ‘अस्वास्थ्य’कारी प्रदूषण! वडाळा, कुलाबा सर्वाधिक प्रभावित; शहरावर थंड वारा, धुक्याची चादर
Published on

प्रथमेश खराडे/मुंबई

मुंबईतील थंड वाऱ्याने रहिवाशांना हिवाळ्याची चाहूल लागली. मात्र, शहरावर पसरलेल्या धुक्याच्या थराने वायुप्रदूषणाचे चिंताजनक चित्र समोर आले आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, शुक्रवारीही दिवसभर आकाश स्वच्छ राहणार असून दिवसाचे तापमान ३२° अंश आणि किमान तापमान १९ अंशपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. यामुळे सकाळच्या वेळात हलकी गारवा जाणवेल. तथापि, हवामान आनंददायी असले तरी सकाळी दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली होती, कारण शहरभर धुक्याची आणि स्मॉगची साचलेली पातळी वाढली होती.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे काही काळ हवेतील प्रदूषण कमी झाले होते आणि ओलावा वाढल्याने वातावरण स्वच्छ झाले होते. तो प्रभाव अल्पकाळ टिकला. पाऊस थांबल्यानंतर मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) पुन्हा एकदा अस्वास्थ्यकर श्रेणीत घसरला आहे.

एअर क्वालिटी इंडेक्स ‘अस्वास्थ्यकर’ श्रेणीत

एक्यूआय.इन आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी मुंबईचा एकूण एक्यूआय २३३ होता. तो ‘अस्वास्थ्य’ श्रेणीत मोडतो. हा आकडा या महिन्याच्या सुरुवातीला नोंदवलेल्या मध्यम स्तरापेक्षा लक्षणीयरीत्या सुमार आहे. अनेकांनी हवेतील जळल्यासारखा वास आणि धूसर आकाशरेषा असल्याची नोंद केली. हे लक्षण सामान्यतः हवेतील पीएम २.५ कणांच्या वाढलेल्या प्रमाणाशी संबंधित असते. एक्यूआय श्रेणी मार्गदर्शकानुसार, १५१-२०० ही पातळी अस्वास्थ्यकरी मानली जाते.

वडाळा येथे सर्वाधिक धोकादायक हवा

शहरातील वायुगुणवत्ता मोजणाऱ्या केंद्रांपैकी वडाळा ट्रक टर्मिनलने सर्वाधिक चिंताजनक आकडे नोंदवले. एक्युआय ४०५ हा अत्यंत धोकादायक श्रेणीत मोडतो. कुलाबा (३०५) आणि माझगाव (२९५) या ठिकाणीही हवा अस्वास्थ्यकर पातळीवर होती. तसेच बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (२८७) आणि देवनार (२७०) या भागांतील हवादेखील अस्वास्थ्यकर श्रेणीत राहिली.

पश्चिम उपनगरांत स्थिती समाधानकारक नाही

जोगेश्वरी (१२०) आणि मालाड पश्चिम (१३३) ‘खराब’ श्रेणी सांताक्रूझ पूर्व (१३७), कांदिवली पूर्व (१६०) आणि बोरिवली पूर्व (१६३) ‘खराब’ ते ‘अस्वास्थ्यकर’ दरम्यान या फरकांनंतरही संपूर्ण मुंबईवर धुक्याची चादर पसरलेली दिसून आली. यामुळे मुंबई पुन्हा एकदा प्रदूषणाच्या धोकादायक मर्यादेकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in