
मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने केंद्र सरकारने ही चिंता व्यक्त केली असून, हवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने ६५४ कोटी रुपयांचे अनुदान मुंबई महापालिका प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासह मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.
मुंबईतील हवेचा स्तर गेल्या काही दिवसांपासून खालावला असून, यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे दमा, श्वसनाच्या विकारात वाढ झाली आहे. मुंबईतील हवेचा स्तर उंचावण्यासाठी मुंबई महापालिका अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व पाठविलेल्या नमुन्याप्रमाणे मुंबईतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने हवेचा कृती आराखडा तयार केला आहे. कृती आराखड्यात रस्त्यांचे रुंदीकरण करणे, अडथळे दूर करून वाहतूककोंडी कमी करणे, वाहतूक शिस्तबद्ध करणे, अत्याधुनिक वाहतूक प्रणाली विकसित करणे, वांद्रे-कुर्ला संकुल, लोअर परळ इत्यादी विभागातील वाहनांद्वारे उत्सर्जित होणारे हवा प्रदूषण कमी करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रित करणे या संबंधातील उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.
राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत १० कोटींचा निधी
मुंबई महापालिकेला राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, तर भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत पालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ३३० कोटी (अंदाजे) अनुदान दिले आहे. तसेच पाण्याचे संरक्षण, पुरवठा, व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे ३२४ कोटी असे एकूण ६५४ कोटी रुपये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
'या' उपाययोजनांची अंमलबजावणी!
-पाणी शिंपडण्यासाठी यांत्रिकी झाडू खरेदी
-वाहतुकीसाठी ई-बसेस खरेदी करणे
-बॅटरी चार्जिंग स्टेशन सुरू करणे
-हरित पट्ट्याची वाढ व सुधारणा करणे
-कचऱ्याचे ऊर्जेत रूपांतरण करणे