मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस वायू प्रदूषणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) २६ नोव्हेंबरपासून सातत्याने सुधारणा होत असून मागील ४८ तासांत लक्षणीय सुधारणा आढळली आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
सध्या मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होईल, यावर भर दिला जात आहे. यासाठी विविध बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच, ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन स्टेज-४ (ग्रॅप-४) मुंबईसाठी सध्या लागू नाही, मात्र संनियंत्रणासंदर्भात (मॉनिटरिंग) निर्देश देण्यात आले आहेत, असे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
गगराणी म्हणाले की, मुंबई शहर व उपनगर क्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रभावीपणे उपायोजना केल्या जात आहेत. यामध्ये बेकरी तसेच स्मशानभूमीचे स्वच्छ इंधनावर परिवर्तन, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टींग मशीनच्या सहाय्याने फवारणी, पाण्याने रस्ते धुवून काढणे आणि विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन, नागरिकांमध्ये जनजागृती यासह विविध उपाययोजनांचा समावेश आहे. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने २८ मुद्द्यांचा समावेश असलेली मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.”
९४ भरारी पथकांची नियुक्ती
या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन व्हावे, यासाठी महानगरपालिकेकडून सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर एकूण ९४ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी खासगी प्रकल्पांसह रस्ते, मेट्रो आदी शासकीय प्रकल्पांची पाहणी करत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. बांधकाम स्थळी संवेदक (सेन्सॉर) आधारित एक्यूआय मोजणारे संयंत्र कार्यान्वित राहतील, याची पाहणीसुद्धा या पथकाकडून सुरू आहे. मुंबईत पेटवल्या जाणाऱ्या शेकोट्यांवरही या पथकाची नजर असेल.