मुंबई : वायू गुणवत्तेचे होणार सर्वेक्षण; चार मोबाईल व्हॅनचा वापर करणार, सर्व्हरच्या माध्यमातून डेटा लॅबमध्ये उपलब्ध होणार

मुंबईतील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वंकष, दीर्घकालीन व तत्काळ उपाययोजना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
मुंबई : वायू गुणवत्तेचे होणार सर्वेक्षण; चार मोबाईल व्हॅनचा वापर करणार, सर्व्हरच्या माध्यमातून डेटा लॅबमध्ये उपलब्ध होणार

मुंबई : जंक्शन, डम्पिंग ग्राऊंड, भराव असलेल्या ठिकाणी आता वायू गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंचलित वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण फिरत्या वाहनांचा (मोबाईल व्हॅन) वापर करणार आहे. सर्वेक्षणाचा डेटा सर्व्हरच्या माध्यमातून डेटा लॅबमध्ये उपलब्ध होणार आहे. दरम्यान, प्रदूषण कमी करण्यासह मुंबईकरांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

मुंबईतील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वंकष, दीर्घकालीन व तत्काळ उपाययोजना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. मुंबईतील विविध ठिकाणी वायू प्रदूषणाच्या नोंदी घेण्यासाठी फिरते सर्वेक्षण वाहन वापरण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींचे जलदगतीने निवारण करण्यासाठी फिरत्या वाहनांमार्फत उपलब्ध होणारी माहिती उपयुक्त ठरणार आहे. तसेच यंत्रणेलाही या वाहनांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग होईल. परिणामी प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्यासाठी ही उपलब्ध आकडेवारी अतिशय उपयुक्त ठरेल, अशी माहिती उपायुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी दिली.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १८ नोव्हेंबर २००९ च्या सूचनापत्रात एकूण १२ प्रदूषकांच्या वायू दर्जाची राष्ट्रीय मानके निर्धारित करण्यात आलेली आहेत. त्यानुसार वातावरणातील विविध प्रदूषित घटकांचे मापन करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. मुंबई वायू प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा - २०१९ हा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ९ ऑक्टोबर २०१९ रोजी स्वीकारला आहे. या कृती आराखड्यातील स्त्रोत गट : इतर शहर विशिष्ट ९ (i) नुसार विविध प्रदूषकांचे नमुने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची माहिती अभ्यासण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी नियमितपणे वायू सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.

असा होणार मोबाईल व्हॅनचा उपयोग

पालिका क्षेत्रात स्थाननिहाय वायू गुणवत्तेच्या वर्तमान स्थितीची अचूक माहिती उपलब्ध करून देणे

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषण समस्येवर उपाययोजना शोधण्याच्या प्रक्रियेत सहभाग

हवामानविषयक घटक उदा. तपमान, हवेतील सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा इत्यादीबाबत माहिती उपलब्ध करून देणे.

प्रदूषण नियंत्रणास सुलभता निर्माण करून स्वच्छ व हरित मुंबईचे स्वप्न साकार होण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in