मुंबई विमानतळावर २४ महिलांना ३७ कोटींच्या सोन्यासह अटक

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘महसूल गुप्तचर संचालनालया’ने (डीआरआय) मोठी कारवाई करत २४ परदेशी महिलांना अटक केली आहे.
मुंबई विमानतळावर २४ महिलांना ३७ कोटींच्या सोन्यासह अटक
मुंबई विमानतळावर २४ महिलांना ३७ कोटींच्या सोन्यासह अटक
Published on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘महसूल गुप्तचर संचालनालया’ने (डीआरआय) मोठी कारवाई करत २४ परदेशी महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३७.७४ कोटी रुपये किमतीचे २९.३७ किलो सोने जप्त केले. ‘डीआरआय’च्या मुंबई विभागीय युनिटने बुधवारी ‘ऑपरेशन धहाबू ब्लिट्झ’ अंतर्गत ही मोहीम राबवली.

केनियातील नैरोबी येथून काही महिला सोन्याची तस्करी करून मुंबईत येत असल्याची पक्की माहिती ‘डीआरआय’ला मिळाली होती. त्याच्या आधारे विमानतळावर सापळा रचून नैरोबीहून आलेल्या २४ परदेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या सामानाची आणि कपड्यांची झडती घेतली असता २५.१ किलो सोन्याचे बिस्कीट आणि ४.२७ किलो सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

तपास यंत्रणांच्या तावडीतून सुटण्यासाठी या महिलांना सोने लपवण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेला चकवा देण्यासाठी एका संघटित टोळीने या महिलांचा वापर केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या आरोपी महिलांना न्यायालयात हजर केले जाणार असून, या तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in