मुंबई एअरपोर्टवर सोनं तस्करीच्या नव्या 'जुगाड'चा पर्दाफाश! ₹२.१५ कोटींचे सोने जप्त, बांगलादेशी प्रवाशासह एक कर्मचारी अटकेत

मुंबई एअरपोर्टवर सोनं तस्करीच्या नव्या 'जुगाड'चा पर्दाफाश! ₹२.१५ कोटींचे सोने जप्त, बांगलादेशी प्रवाशासह एक कर्मचारी अटकेत

बांगलादेशी प्रवाशासह कंत्राटी कर्मचारी बी. आर. सकपाळ यालाही अटक करण्यात आली आहे. तस्करीची ही पद्धत रोखली नाही तर भविष्यात याच पद्धतीने अधिक मोठ्या प्रमाणावर तस्करी होण्याचा धोका असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
Published on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत बांगलादेशी प्रवासी आणि विमानतळावरील कंत्राटी कर्मचारी अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.

गुप्त माहितीद्वारे पकडले, सोनं तस्करीचा नवा 'जुगाड'

मुंबई विमानतळावर ट्रान्झिट प्रवासी (एखादा प्रवासी एका देशातून किंवा शहरातून दुसऱ्या देशात/शहरात जाण्यासाठी उड्डाण घेतो, पण त्याला मधल्या एअरपोर्टवर काही वेळ थांबावे लागते - अशा प्रवाशाला ट्रान्झिट ट्रॅव्हलर किंवा ट्रान्झिट प्रवासी म्हणतात) म्हणून उतरून मग वॉशरूमचा वापर सोन्याच्या तस्करीसाठी करायचा, असा हा स्मगलिंगचा नवा प्रकार समोर आला आहे. सीमाशुल्क विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, एक ट्रान्झिट प्रवासी सोन्याच्या तस्करीमध्ये सामील आहे आणि तो मुंबई विमानतळाच्या निर्गमन (डिपार्चर) परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला तस्करीचा माल सोपवणार आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विमानतळावरील कंत्राटी कर्मचारी बी. आर. सकपाळ आणि ट्रान्झिट प्रवासी रकिबूर रहमान यांच्यावर पाळत ठेवली होती. तपासादरम्यान सकपाळ हा डिपार्चर परिसरातील वॉशरूममधून सोन्याच्या कॅप्सूल गोळा करताना आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून चार सोन्याच्या कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. या कॅप्सूलचे एकूण वजन १,५९० ग्रॅम असून त्यांची किंमत सुमारे २.१५ कोटी रुपये असल्याचे कस्टम्सने सांगितले.

फक्त ३० हजारांसाठी

सकपाळने चौकशीत हे सोने दुबईहून आलेल्या बांगलादेशी प्रवासी रकिबूर रहमान याच्या मार्फतच आल्याचा खुलासा केला. तर, रहमाननेही सोन्याच्या तस्करीची कबुली दिली असून, हे सोने तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आणल्याचे सांगितले आहे. सोनं स्वीकारण्यासाठी सकपाळला ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते, अशी माहिती कस्टम्स अधिकाऱ्यांनी दिली.

तस्करीची ही पद्धत रोखली नाही तर...

विमानतळातील प्रवेशाधिकाराचा गैरवापर करून केलेली ही तस्करी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. या प्रकरणाच्या धाग्यांवरून कस्टम्स विभागाने तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा तपास सुरू केला आहे. यामध्ये सूत्रधार, आर्थिक पुरवठादार आणि इतरांचा शोध घेतला जात असून, तस्करीची ही पद्धत रोखली नाही तर भविष्यात याच पद्धतीने अधिक मोठ्या प्रमाणावर तस्करी होण्याचा धोका असल्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in