

मुंबई : विमानात पहाटे सुरू झालेल्या प्रसूतीकळांची माहिती मिळताच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वैद्यकीय पथकाने इतर सर्व यंत्रणेशी समन्वय साधत महिलेला विमानतळाच्या रुग्णवाहिकेत रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढा वेळ नसल्याचे स्पष्ट झाल्यावर या पथकाने रुग्णवाहिकेतच महिलेची सुरक्षित प्रसूती केली. अदानी विमानतळ होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल)ची उपकंपनी असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल)च्या वैद्यकीय आणि कार्यकारी पथकाने ही कामगिरी केली.
या वैद्यकीय पथकात डॉ. कृतिका, डॉ. मधू आणि डॉ. किसले यांचा समावेश होता. त्यांना परिचारका माधुरी आणि अशोक तसेच रुग्णवाहिका चालक ओमकार यांचे सहकार्य लाभले.
मुंबई विमानतळाच्या वैद्यकीय पथकाला १० फेब्रुवारीला पहाटे ५ वाजून १७ वाजता मिनिटांनी महिला प्रवाशाकरिता तातडीच्या मदतीची गरज असल्याची माहिती मिळाली. ही २६ वर्षीय महिला प्रवासी टांझानियाची नागरिक होती. ती साधारणपणे ३६ आठवड्यांची गर्भवती होती आणि आंतरराष्ट्रीय भागातून प्रवास करत असताना तिला तीव्र प्रसूतीकळा सुरू झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय पथकाने रुग्णवाहिकेतच तिची प्रसूती केली आणि एका सुदृढ मुलीचा जन्म झाला.