

मुंबई : मुंबई विमानतळाचा उच्च-फ्रिक्वेन्सी रडार दहिसर येथून गोराई येथे हलवण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) घेतला असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी याला मंजुरी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.
यामुळे दहिसरमधील विकासकामांमध्ये येणारे अडथळे दूर होणार आहे. या निर्णयामुळे उत्तर मुंबईतील दहिसर परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला ‘एक्स’ या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितले. राज्य सरकारने या आधीच रडार प्रणालीसाठी गोराई येथे जमीन देण्याचा निर्णय घेतला होता, असे फडणवीस म्हणाले.
परवडणारी घरे बांधणार
गेल्या महिन्यात नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी जाहीर केले होते की, दहिसर येथील एएआयचा उच्च-फ्रिक्वेन्सी रडार गोराई येथे हलवण्यात येणार आहे. त्यामुळे दहिसरमधील शेकडो एकर जमीन परवडणाऱ्या घरांसाठी उपलब्ध होणार आहे. हा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र सरकार तसेच इतर संबंधित घटकांमधील बैठकीनंतर घेण्यात आला.