

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मान्सून पूर्व देखभालीच्या कामांसाठी गुरूवार ७ मे रोजी ६ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. विमानतळ माहितीनुसार विमानतळावरील प्रशासनाच्या ०९/२७ आणि १४/३२ रनवेवर हे दुरुस्तीचे काम केले जाईल. प्रवासी तसेच, विमानातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विमानतळ दुरुस्तीचे हे काम खूप गरजेचे आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे. विमानतळाच्या दुरुस्तीचे नियोजन गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे.
७ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण सहा तासांसाठी हे विमानतळ बंद असेल. या विमानाचे दोन्ही रनवे बंद असतील. पावसाळा सुरू होण्याआधी विमानतळाच्या डागडुजीचे काम केले जाणार आहे. या सहा तासांत कोणत्याही विमानाचे टेकऑफ होणार नाही. तसेच कोणतेही विमान या विमातळावर उतरणार नाही.
या काळातील विमानांचे वेळापत्रक आधीच बदलण्यात आले आहे. विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवाशांना प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधून विमानाची अचूक वेळ तपासण्याचा सल्ला दिला होता.विमान कंपन्यांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इतर पर्यायी वेळेची तिकिटे आणि उड्डाणांचे नियोजन केले होते. पावसाळ्यामध्ये विमानांची उड्डाणे सुरक्षित आणि विनाअडथळा सुरू राहावीत, यासाठी विमानतळ प्रशासनाकडून दरवर्षी मान्सूनपूर्व देखभाल केली जाते.