
मुंबई : उन्हाच्या तडाख्याने आणि घामाने बेजार झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची खबर म्हणजे, मुंबई आणि महानगर प्रदेशांमध्ये या आठवड्यात हलक्या पावसाची तसेच विजांच्या कडकडाटाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या १ आणि २ एप्रिल रोजी मुंबईत हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान केले होते. मुंबईकरांना मात्र गेल्या आठवड्यापासून प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र मंगळवारपासून आकाश काहीसे ढगाळ राहणार आहे. रविवारी सांताक्रुझ वेधशाळेत किमान २४.३ आणि कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढच्या ४८ तासांत, मुंबई शहरातील कमाल आणि कमान तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे, तसेच आकाश निरभ्र राहील.
२५-२६ एप्रिल आणि ९-११ मार्चदरम्यान मुंबईकरांना दोन वेळा
उष्माघाताच्या त्रासाला सामोरे जावे लागले. मार्च महिन्याच्या शेवटी मुंबईककरांचा उष्ण आणि दमट हवामानाने घामटा निघाला असला तरी पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे काहीसा दिलासाही मिळाला. प्रखर उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरवर परिणाम होऊ नये, यासाठी राज्य सरकारने शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश दिले आहेत.
एप्रिलमध्ये उष्माघाताची झळ
जागतिक तापमान बदलाचा फटका संपूर्ण देशवासीयांना सहन करावा लागणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताची झळ नागरिकांना सोसावी लागणार आहे. “एप्रिलमधील तापमान हे साधारण तापमानापेक्षा १ ते २ अंश सेल्सिअसने अधिक राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना उष्माघाताला सामोरे जावे लागणार नसले तरी कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र उष्माघाताचा प्रकोप पाहायला मिळणार आहे, असे मुंबईतील हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी सांगितले.