

मुंबई : अंधेरी पूर्व येथील जुन्या नागरदास रोडवरील ‘श्री अंधेरी क.वी.ओ. सेवा समाज चौक’ येथील बेस्ट बस थांब्याच्या शेल्टरचा वाद आता बेस्ट समितीत पोहोचला आहे. या ठिकाणी बस शेल्टरचे बांधकाम किंवा नूतनीकरण नेमके कोणाच्या परवानगीने करण्यात आले, असा सवाल उपस्थित झाला असतानाच, बेस्ट प्रशासनाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. बेस्टची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हे काम करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उद्धवसेनेचे बेस्ट समिती सदस्य सचिन पाटील यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून याकडे लक्ष वेधले. संबंधित बस थांब्यावर बेस्टचे अधिकृत बोधचिन्ह लावण्यात आले असून शिंदेसेनेचे आमदार मूरजी पटेल यांच्या सौजन्याने हे काम केल्याचा उल्लेख असलेला फलकही लावण्यात आला आहे. या बस शेल्टरच्या कामासाठी बेस्ट प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती का तसेच महापालिका आणि वाहतूक पोलिसांची मान्यता घेण्यात आली होती का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
परवानगी घेतली
आमदार मुरजी पटेल यांनी आपण कोणतेही काम परवानगीशिवाय करत नसल्याचे सांगत, संबंधित बस थांब्याचे नूतनीकरण म्हाडामार्फत आणि आमदार निधीतून करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात बेस्टची परवानगी, जागेची मालकी, निधीचा स्रोत आणि प्रत्यक्ष काम करणारी यंत्रणा याबाबतचा खुलासा अहवालातून होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.