

मुंबई : अंधेरी, लोखंडवाला परिसरातील रुनवाल एलिगंट या उंच निवासी इमारतीत अग्नी भडका उडाला. आग लागल्याची माहिती मिळताच इमारतीतील लिफ्ट ऑपरेटर धनपत महातू यांनी रहिवाशांच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र, दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या धनपत महातू यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे इमारत व परिसरात शोकाकुल वातावरणात पसरले आहे.
रुनवाल एलिगंट इमारतीच्या ‘सी’ विंगच्या १७व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शनिवारी रात्री उशिरा आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, अदानी वीज कंपनी, रुग्ण वाहिका व पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री १०.३७ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ज्या घरात आग लागली त्यावेळी फ्लॅटमध्ये एक ज्येष्ठ महिला आणि घरकाम करणारी महिला उपस्थित होती. घरकाम करणाऱ्या महिलेने ज्येष्ठ महिलेला सुरक्षितपणे खाली आणले. दरम्यान, इमारतीत धूर पसरल्याची जाणीव असतानाही धनपत महातू यांनी अन्य लिफ्टमधून प्रवास करणाऱ्या रहिवाशांच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांना लिफ्ट लॉबीमध्ये बेशुद्ध अवस्थेतून बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बचाव करताना त्यांच्या हातापायांची हालचाल सुरू होती. मात्र कूपर रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला आणि आणलेल्या शिडीची उंची १७व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकली नसल्याचा आरोप काही रहिवाशांनी केला. आग लागल्याची माहिती देण्यासाठी फोन करणाऱ्या रहिवाशांना संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीबाबत विचारण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
स्थानिक भाजप नगरसेवक रुपेश सावकर यांनीही या परिसरात स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली आहे. लोखंडवाला परिसरात अग्निशमन केंद्र नसल्याने आणि मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासातून उंच इमारती उभ्या राहत असल्याने येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र तसेच उंच इमारतींपर्यंत पोहोचू शकणारी हायड्रॉलिक शिडी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित !
अग्निशमन दलाच्या अंधेरी केंद्राच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार फ्लॅटमधील पूजेच्या खोलीत दिवा लावण्यात आला होता. कुटुंबीय पूजा आटोपून बाहेर गेले असताना ज्येष्ठ महिला आणि घरकाम करणारी महिला फ्लॅटमध्ये होत्या. इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती आणि आग विझविण्याच्या कामात तिची मदत झाली. दरम्यान, आगीचा धोका लक्षात घेऊन ‘सी’ विंगमधील संपूर्ण रहिवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आले. आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.