

मुंबई : कंट्रोल सिस्टममध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारी तब्बल दोन वेळा कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३ मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली. बोगद्यात ३० मिनिटे रेल्वेगाड्या थांबल्याने प्रवाशी अडकून पडले. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला. दिवसात दोन वेळा मेट्रो विस्कळीत झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्रवाशांनी वाद घातल्याने तिकीट खिडकीवर तिकीट घेतलेल्या प्रवाशांना पैसे परत करण्यात आले, तर ऑनलाइन पद्धतीने तिकीट घेतलेल्या प्रवाशांना ग्राहक सहाय्यता माध्यमांद्वारे आपली तक्रार नोंदवता येणार आहे.
गेले काही दिवसांपासून मेट्रो ३ ची सेवा वारंवार विस्कळीत होऊ लागली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवासी कार्यालयात निघाले असतानाच सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मेट्रो सेवा ठप्प झाली. यामुळे मेट्रोची ऑनलाइन तिकिटे घेतलेल्या प्रवाशांची कोंडी झाली. गाड्या भुयारात अडकून पडल्याने प्रवासीही त्यामध्ये अडकले. काही प्रवाशांना प्रवासासाठी तब्बल २ तास लागले. अखेर काही वेळानंतर गाडी स्थानकात येताच प्रवासी सुटकेचा श्वास घेत इच्छित स्थळी जाण्याऐवजी सुरक्षित रेल्वे स्थानकात उतरले. त्यामुळे आज मेट्रोने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना कार्यालयात पोचण्यास विलंब झाला. सकाळी झालेला बिघाड ९.३० वाजण्याच्या सुमारास दुरुस्त करण्यात आला. तोवर सर्व मेट्रो स्थानकाबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
बिघाड दुरुस्त झाल्यानंतर काही तास मेट्रो सुरळित होत होती. तोवर दुपारी १२.४५ वाजता पुन्हा कंट्रोल सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने मेट्रो सेवा कोलमडली. गाड्या धीम्या झाल्याने पुन्हा प्रवाशी गाडीत अडकून पडले. हा बिघाड सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास दुरुस्त झाला. त्यामुळे मेट्रोने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
श्वास कोंडणाऱ्या वातावरणात मेट्रो प्रशासनाचे मौन आणि कर्मचाऱ्यांचे प्रवाशांप्रती असलेले बेजबाबदार वर्तन यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. धारावी मेट्रो स्थानकावर झीशान नावाच्या दिव्यांग प्रवाशाने ऑनलाईन तिकीट काढूनही, त्याला मदत मिळण्याऐवजी महिला कर्मचाऱ्याच्या उद्धटपणाला सामोरे जावे लागले. या भुयारी मार्गावर अडकल्यानंतर रुग्ण किंवा वयोवृद्ध प्रवाशांची स्थिती काय होत असेल, याचा विचारही प्रशासन करताना दिसत नसल्याची प्रतिक्रिया पत्रकार दीपक कैतके यांनी व्यक्त केली आहे.
बोगद्यातील भयंकर अनुभव
‘कोंबडीला खुराड्यात कोंडावे, तशी आमची अवस्था झाली होती,’ असा संताप मेट्रो-३ मध्ये अडकलेल्या प्रवाशांनी व्यक्त केला. दुपारी धारावी स्थानक ते चर्चगेटपर्यंतच्या प्रवासासाठी दोन तास लागले. यातील सव्वा तास बोगद्यातच मेट्रो ठप्प होती. भुयारी मार्गावर मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांचा बाहेरच्या जगापासून पूर्णपणे संपर्क तुटला होता.
एमएमआरसीकडून दिलगिरी
तांत्रिक बिघाडामुळे आज बोगद्यात सुमारे ३० मिनिटे रेल्वेगाड्या तात्पुरत्या थांबल्याने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच एमएमआरसीने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आणि तांत्रिक व परिचालन पथकांकडून परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवले. आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना केल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात असल्याचे एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
परताव्यासाठी तक्रार नोंदवावी लागणार
ज्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खरेदी केले होते, त्यांना थेट परतावा देण्यात आला आहे, तर ज्या प्रवाशांनी ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक केले आहे, त्यांना परताव्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निर्धारित ग्राहक सहाय्यता माध्यमांद्वारे आपली तक्रार नोंदवण्याची विनंती एमएमआरसीकडून करण्यात आली आहे.