Mumbai : मध्यवर्ती ग्रंथालयाच्या जागेवर एशियाटिक सोसायटीचा डोळा; सरकारी कार्यालये इतरत्र हलविण्याची मागणी

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक टाऊन हॉलच्या इमारतीत असलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयासह अन्य सरकारी कार्यालये लवकरात लवकर स्थलांतरित करण्याची मागणी एशियाटिक सोसायटीने राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.
Mumbai : मध्यवर्ती ग्रंथालयाच्या जागेवर एशियाटिक सोसायटीचा डोळा; सरकारी कार्यालये इतरत्र हलविण्याची मागणी
Mumbai : मध्यवर्ती ग्रंथालयाच्या जागेवर एशियाटिक सोसायटीचा डोळा; सरकारी कार्यालये इतरत्र हलविण्याची मागणी
Published on: 

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक टाऊन हॉलच्या इमारतीत असलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयासह अन्य सरकारी कार्यालये लवकरात लवकर स्थलांतरित करण्याची मागणी एशियाटिक सोसायटीने राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. सोसायटीच्या या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून टाऊन हॉलच्या संपूर्ण जागेवर एशियाटिक सोसायटीचा डोळा असल्याचा आरोप होत आहे. मात्र, सोसायटीने हा आरोप फेटाळून लावला आहे.

इतिहास, साहित्य, संस्कृती भाषा आणि संशोधनाच्या क्षेत्रातील महत्त्वाची संस्था मानल्या जाणाऱ्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली. या निवडणुकीत विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल निवडून आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सप्टेंबरमध्ये सोसायटीचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर टाऊन हॉलमधील राज्य सरकारी कार्यालये इतरत्र हलविण्याचा प्रयत्नांना वेग आला. राज्यातील ११ हजारांहून अधिक सार्वजनिक ग्रंथालयांचे नियमन करणाऱ्या महाराष्ट्र ग्रंथालय संचालनालयाचे कार्यालय टाऊन हॉलच्या इमारतीत आहे. याशिवाय प्रधान मुद्रांक कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य महिला परिषदेचे कार्यालयही आहे. एशियाटिक सोसायटीला आपल्या कामकाजासाठी जागा अपुरी पडू लागल्याने येथील इतर सरकारी कार्यालये अन्यत्र स्थलांतरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सोसायटीने मुख्य सचिव कार्यालयाला पत्र पाठवले आहे. या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालय निर्णय घेणार आहे.

टाऊन हॉलची इमारत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून जवळ असल्याने राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यातून कामानिमित्त येणाऱ्या पदाधिकारी, अभ्यागत, कार्यकर्ते आणि नागरिकांची सोय होते. त्यामुळे मध्यवर्ती ग्रंथालय आणि ग्रंथालय संचालकांचे कार्यालय येथून हलविल्यास नागरिकांची गैरसोय होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

ग्रंथालय संचालनालयाला सध्याची जागा अपुरी पडत असल्याने सरकारने कलिना येथे नवी इमारत उभारण्याचा निर्णय घेतला. ही इमारत तयार असून फर्निचर आणि सजावटीचे काम पूर्ण झालेले नाही. ते होताच मध्यवर्ती ग्रंथालय आणि संचालनालयाचे कार्यालय तेथे स्थलांतरित होईल.

अशोक गाडेकर, ग्रंथालय संचालक

ग्रंथालय संचालनालय आणि मध्यवर्ती ग्रंथालयाला कलिना येथे जागा देण्यात आली आहे. त्यामुळे सोसायटीने राज्य सरकारला पत्र लिहून ग्रंथालय आणि अन्य सरकारी कार्यालये इतरत्र नेण्याची मागणी केली आहे. या जागेवर संस्थेला प्रदर्शन तसेच अन्य उपक्रम हाती घ्यायचे आहेत.

विवेक गणपुले, सचिव, एशियाटिक सोसायटी