मुंबईच्या सांस्कृतिक वारशांपैकी एक मानले जाणाऱ्या आयकॉनिक ऱ्हिदम हाऊसचा लिलाव करण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी परदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याकडे या ऱ्हिदम हाऊसची सध्या मालकी होती. ६५०० कोटी रुपयांचा घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ऱ्हिदम हाऊसचा लिलाव करण्यात आला. सुमारे ३० कोटी रुपयांना ऱ्हिदम हाऊसची विक्री करण्यात आली.
ऱ्हिदम हाऊसशी असंख्य मुंबईकरांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. संगीतप्रेमींचे आवडते ठिकाण अशी ऱ्हिदम हाऊसची ख्याती.
जुन्या हिंदी-मराठी गाण्यांच्या रेकॉर्ड्स, देशी परदेशी प्रसिद्ध गजल गायकांच्या गजल्सच्या कॅसेट्स, जॅझ संगीताच्या कॅसेट यांच्या चाहत्यांसाठी ऱ्हिदम हाऊस हे जणू हक्काचे ठिकाण होते. दक्षिण मुंबईतील काला घोडा परिसरात मागील जवळपास ५ दशके ऱ्हिदम हाऊसचे अस्तित्व टिकून होते.
३० कोटींना विक्री
परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीने २०१७ मध्ये ऱ्हिदम हाऊस त्याच्या मूळचे मालक मेहमूद मोहम्मद हुसेन यांच्याकडून विकत घेतले होते. मात्र, नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेकडून ६५०० कोटींचे कर्ज घेऊन पोबारा केला. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ईडीने मोदीच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या. कर्जवसुली करण्यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने २०२० मध्ये नीरव मोदीच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ऱ्हिदम हाऊसचा लिलाव करण्यात आला. नुकत्याच झालेल्या लिलावात शाही एक्सपोर्ट या भारतातील आघाडीच्या कपडे निर्मिती करणाऱ्या कंपनीची उपकंपनी भाने रिटेलने सर्वाधिक सुमारे ३० कोटी रुपयांची बोली लावून ही वास्तू विकत घेतली आहे.